देशभक्त असल्याची शिक्षा मिळत आहे !

आर्यन खानला अटक करणारे समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया

समीर वानखेडे आणि आर्यन खान (संग्रहित चित्र)

मुंबई – केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एन्.सी.बी.) माजी विभागीय संचालक समीर वानखडे यांच्याशी संबंधित २९ ठिकाणांवर धाड टाकली आहे. घरात त्यांना १८ सहस्र रुपये आणि मालमत्तेची ४ कागदपत्रे सापडली आहेत. आर्यन खानची सुटका करण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या पार्श्वभूमीवर ‘देशभक्त असल्याची शिक्षा मिळत आहे.’ अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी माध्यमांना दिली आहे. ‘माझे वडील आणि वृद्ध सासू-सासरे यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली. माझ्या निवासस्थानावर धाड टाकली आणि १२ घंट्यांपेक्षा अधिक काळ झडती घेतली. संबंधित मालमत्ता मी सेवेत रुजू होण्यापूर्वी विकत घेतली होती’, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

समीर वानखेडे यांनी २ ऑक्टोबर २०२१ या दिवशी मुंबईतील कार्डेलिया क्रूझवरील रेव्ह पार्टीवर धाड टाकून आर्यन खानला अटक केली होती. या प्रकरणातून आर्यन खानला सुखरूप सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटींची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. समीर वानखेडे यांच्याशी संबंधित सुमारे २९ ठिकाणांवर धाड टाकण्यात आली आहे.