वीजदेयकांसाठी छापील कागदांचा वापर बंद करत पुणेकरांनी केली कोट्यवधींची बचत !

पुणे – वीजदेयकांसाठी छापील कागदांचा वापर पूर्णपणे बंद करत केवळ ‘ई-मेल’ आणि लघुसंदेश यांचा पर्याय निवडणार्या पुणे परिमंडलातील पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी अनुमाने एक लाखांचा टप्पा गाठला आहे. ‘महावितरण’च्या ‘गो-ग्रीन’ योजनेच्या अंतर्गत पुणे परिमंडलाने राज्यात आघाडी घेतली असून या योजनेमुळे १ लाख ७ वीजग्राहकांची १ कोटी २० लाख ८४० रुपयांची वार्षिक बचत होत आहे. राज्यात ३ लाख ८७ सहस्र ७५७ वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभाग घेतला आहे.

समृद्ध पर्यावरणासाठी ‘गो-ग्रीन’ योजना काळाची आवश्यकता आहे. कागदी मासिक देयकाचा वापर बंद करून या योजनेत अधिक वीजग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे.