थायलंडमधील निवडणुकीत सैन्यविरोधी पक्षांना लक्षणीय यश, तरीही सत्तेच्या किल्ल्या सैन्याच्याच हाती !

बँकॉक – थायलंडमधील सार्वजनिक निवडणुकीत सैन्याच्या विरोधात असलेल्या  ‘फॉरवर्ड पार्टी’ आणि ‘पॉप्युलिस्ट फेयु थाई पार्टी’ या राजकीय पक्षांना लक्षणीय यश मिळाले आहे. निवडणुकीत या पक्षांनी ‘नागरिकांना जनतेला सैन्य शासनापासून मुक्तता देऊ’, ‘देशातील राजशाही अवमान कायद्यात पालट करू’, ‘सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखू’, अशी आश्‍वासने दिली होती.

थायलंडमधील राजकीय पक्षांमध्ये सैन्य समर्थित आणि सैन्यविरोधी असे २ गट आहेत. गेल्या एक दशकापासून थायलंडवर सैन्य समर्थित सरकारची सत्ता होती. आता ती विरोधी पक्षांच्या हातात जवळपास गेली आहे. थायलंडमधील ४०० पैकी ११३ जागा ‘फॉरवर्ड पार्टी’ला, तर ११२ जागा या ‘पॉप्युलिस्ट फेयु थाई पार्टी’ मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल घोषित होण्यास अजून काही आठवडे लागू शकतात.

असे असले, तरी सत्तेच्या किल्ल्या अद्यापही सैन्याच्याच हाती आहेत; कारण नियमानुसार थायलंडमध्ये निवडणुकीत कुठल्याही पक्षाचा विजय झाला, तरी त्या पक्षाला सैन्याने नियुक्त केलेल्या २५० सदस्यांच्या प्रतिनिधीमंडळाचा पाठिंबा घ्यावा लागतो. प्रतिनिधीमंडळातील या २५० सदस्यांची नियुक्त थेट सैन्याकडूनच केली जाते. त्यामुळे थायलंडमध्ये कुणीही जरी जिंकून आले, तरी सत्तेच्या किल्ल्या कायम सैन्याच्याच हाती असतात.