दावणगेरे (कर्नाटक) – गोव्यामध्ये भाजपचे सरकार असूनही तेथे श्रीराम सेनेला प्रवेश नाही. श्रीराम सेनेला तेथे कार्य करता येत नाही; मात्र तेच भाजपवाले कर्नाटकात हनुमान चालिसा पठण करत आहेत, अशी टीका कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी केली. ते होन्नाळी येथे पत्रकारांशी बोलत होते.
डी.के. शिवकुमार पुढे म्हणाले की, बजरंगबली आणि बजरंग दल यांच्यात भेद आहे. आम्ही देशद्रोह्यांविषयी बोलत आहोत. बजरंग दल नाव ठेवून देशाची लूट करणार्यांविषयी बोलत आहोत. कर्नाटकच्या किनारपट्टी भागांत बजरंग दलामुळे किती निष्पाप लोक मृत्यू पावले आहेत ? याची त्यांना जाणीव नाही. पंतप्रधान मोदी प्रचारसभेत हनुमानाचे नाव घेतात; त्याऐवजी त्यांनी स्वतःचे ‘नरेंद्र’ हे नाव घ्यावे. नरेंद्र हे देवाचे नाव नाही का ? त्यांचे नाव घ्यावे, अशी उपरोधिक टीका केली. (तोंड आहे म्हणून बरळणारे काँग्रेसचे नेते ! – संपादक)