पाकला माहिती पुरवल्याच्या प्रकरणी पुण्यातील डी.आर्.डी.ओ.च्या संचालकांना ए.टी.एस्.कडून अटक !

‘हनीट्रॅप’मध्ये अडकून पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा संशय

पुणे – येथील संरक्षण संशोधन आणि संस्थेचे (डी.आर्.डी.ओ.चे) संचालक डॉ. प्रदीप कुरुळकर यांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. ‘हनीट्रॅप’मध्ये  अडकून गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे. ‘हनीट्रॅप’मध्ये एखाद्या देशाकडून शत्रूदेशातील संबंधित व्यक्तीकडून गोपनीय माहिती मिळण्यासाठी महिलांचा वापर करून संबंधित व्यक्तीला ‘ब्लॅकमेल’ केले जाते. त्भारतातील संरक्षणाच्या संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यासाठी पाकने अनेक वेळा ‘हनीट्रॅप’चा वापर केला आहे.

१. आतंकवादविरोधी पथकाने डॉ. प्रदीप कुरुळकर यांच्यावर मुंबईत गुन्हा नोंद केला आहे. पुढील अन्वेषण पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. ‘कुरुळकर यांनी कोणती संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली ?’, याचे अन्वेषण आता ए.टी.एस्.कडून केले जात आहे.

२. डॉ. प्रदीप कुरुळकर हे ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ (इंजिनिअर्स) या विभागात काम करतात. डॉ. प्रदीप कुरुळकर ‘हनीट्रॅप’मध्ये अडकून पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांसोबत ‘व्हिडिओ चॅट’ आणि इतर सामाजिक माध्यमांतून संपर्कात असल्याचे फेब्रुवारीमध्ये भारतीय गुप्तचर संस्थांना लक्षात आले होते.

३. त्यानंतर यासंबंधीची माहिती डी.आर्.डी.ओ.ला देण्यात आली. डी.आर्.डी.ओ.च्या ‘व्हिजिलन्स’ विभागाने या प्रकरणाचे अन्वेषण केले आणि एक अहवाल बनवला. या अहवालाच्या प्रती विविध भारतीय अन्वेषण यंत्रणांना देण्यात आल्या. या अहवालाची प्रत मिळाल्यानंतर महाराष्ट्र ए.टी.एस्.ने या प्रकरणाचे अन्वेषण केले आणि कुरुळकर यांना अटक केली. डॉ. कुरुळकर हे या वर्षी नोव्हेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार होते.

संपादकीय भूमिका 

मातृभूमीशी प्रतारणा करणार्‍या अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. डी.आर्.डी.ओ.सारख्या संरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण संस्थेमध्ये असे प्रकार घडत असतील, तर हे गंभीर आहे !