मुरगाव नगरपालिकेची नागरिकांना सूचना
मुरगाव – मुरगाव नगरपालिकेने एका सार्वजनिक सूचनेद्वारे ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी रहाणार्यांना त्यांची निवासस्थाने त्वरित रिकामी करण्यास सांगितले आहे. बोगदा येथील मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या निवासी गाळ्यांच्या मागील बाजू, बोगदा येथील बोगदेश्वर मंदिराची मागील बाजू, देस्तेरो येथील एल मोंते चित्रपटगृहाच्या मागे, मुरगाव अपर जेटी, इस्लामपूर-बायणा, सासमोळे येथील होली क्रॉसजवळ, कांडेलारिया चर्च, गोवा शिपयार्डजवळ, नवे वाडे वास्को, ड्रायव्हर हिल, खारीवाडा, सडा, बोगदा, देस्तेरो, बायणा, हार्बर जेटी, मांगोर हिल, वाडे, नवे वाडे या सर्व ठिकाणी आणि परिसरात पावसाळ्यात भूस्खलन होते अन् पूर येतो, असे आढळून आले असून ही ठिकाणे रहाण्यास धोकादायक असल्याची चेतावणी पालिका गेल्या काही वर्षांपासून देत आली आहे.
नोटिसीत म्हटले आहे की, वरील सर्व ठिकाणे नैसर्गिक आपत्तीप्रवण आहेत. यामुळे हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे निवास करणार्यांच्या जिवाला विशेषतः पावसाळ्यात धोका असल्याने त्यांनी त्वरित त्यांची घरे साहित्यासह रिकामी करून प्रशासनाला सहकार्य करावे. यापूर्वी नोटीस जारी करूनही त्याच निवासात रहाण्याचा रहिवाशांनी निर्णय घेतल्यास तो त्यांच्या स्वतःच्या जोखमीवर राहील, तसेच काही आपत्ती ओढवल्यास ते त्यांचे दायित्व राहील, असे नोटिसीत पुढे म्हटले आहे. (रहिवासी ऐकत नसतील आणि खरोखरच काही आपत्ती ओढवली अन् जीवितहानी झाली, तर पालिका प्रशासन त्यांच्यावर दायित्व ढकलू शकते का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाआपत्तीप्रवण परिसरात पालिका प्रशासनाने निवासस्थाने उभारण्यास अनुमती का दिली ? |