पुणे – ५० सहस्र रुपयांमध्ये इयत्ता दहावीचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी पुणे पोलिसांनी उघड केली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि सांगली येथे ही टोळी कार्यरत असून पाचवी ते सातवीच्या दरम्यान अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न देता आयतेच दहावीचे बनावट प्रमाणपत्र देण्याचा हा अपप्रकार पुणे पोलीस भरती प्रक्रियेवेळी म्हणजे फेब्रुवारीमध्ये समजला. त्यानंतर दोन-अडीच मास अन्वेषण केल्यावर पोलिसांनी पाचवी अनुत्तीर्ण विकी कांबळे या तरुणाला डमी विद्यार्थी बनवून ५० सहस्र रुपयांत बनावट प्रमाणपत्र मिळवत या टोळीचा भांडाफोड केला. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यातील अंमलदार राहुल होळकर यांनी तक्रार दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून ३० आणि सांगलीतून ५ अशी एकूण ३५ बोगस प्रमाणपत्रे जप्त केली आहेत. या गुन्ह्यात आरोपीचे आणखी काही साथीदार संभाजीनगर आणि सांगली या ठिकाणी असून त्यांच्या अन्वेषणासाठी पोलिसांचे पथक रवाना झालेले आहे. सकृतदर्शनी यामध्ये अनुमाने १७ ते १८ लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसत असून एकूण प्रकरणाचे गांभीर्य आणि राज्यभर व्याप्ती पहाता कोट्यवधी रुपयांचा अपव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे.