पणजी, ३ मे (वार्ता.) – आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पुरातन मंदिरांवर अधिक भर देत असतांनाच आता पर्यटन खाते भक्तगणांना जगाच्या पाठीवर कुठूनही गोव्यातील कुलदेवतेची ‘व्हर्च्युअल’ (ऑनलाईन) पूजा करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ही माहिती दिली आहे.
तेे पुढे म्हणाले, ‘‘दुबई अथवा कुठूनही एखादी व्यक्ती गोव्यातील त्याच्या कुलदेवतेची ‘व्हर्च्युअल’ पूजा करू इच्छित असल्यास ते मंदिर पर्यटन खात्याच्या सूचीत असणे आवश्यक आहे. चालू मासात पर्यटन खाते ‘ऑनलाईन’ पूजेची सेवा उपलब्ध करणार्यांसमवेत सामंजस्य करार करणार आहे. यासंबंधी योजना निश्चित करण्यात आल्यानंतर फोंडा परिसर आणि इतर भागांतील प्रसिद्ध मंदिरांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे; मात्र एखादे मंदिर या योजनेत सहभागी होऊ इच्छित नसेल, तर त्यांना योजनेत सहभागी करण्यासाठी बळजोरी केली जाणार नाही.’’
पर्यटन खाते लवकरच ‘होम स्टे’ धोरण राबवणार
मंगेशी, कवळे, रामनाथी, तांबडी सुर्ला येथील मंदिरांना प्रतिवर्ष अनेक पर्यटक भेट देतात. आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच याच परिसरातील पर्यावरणपूरक स्थानांना भेट देण्यासाठी योजना आखणार आहे. या परिसरात २ ते३ दिवस रहाण्याचा पर्याय पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी मंदिरांचा इतिहासही पर्यटक जाणून घेऊ शकणार आहेत. ‘मंदिरे फोंडा तालुक्यात का स्थलांतरित करावी
लागली ?’, याविषयी पर्यटक माहिती जाणून घेऊ शकणार आहेत. यासाठी पर्यटन खाते ‘होम स्टे’ धोरण लवकरच आखणार आहे. हे धोरण लागू झाल्यानंतर महिला सशक्तीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांना चालना मिळणार आहे. याद्वारे स्थानिक महिला ‘होम स्टे’ सुविधा पर्यटकांना उपलब्ध करू शकणार आहे. याचबरोबर या ठिकाणी पर्यटकांसाठी ‘वेलनेस’ (आरोग्य) केंद्रे चालू केली जाणार आहेत.
भारतात प्रतिवर्ष २० ते ३० टक्के पर्यटक योग शिकण्यासाठी येतात.
विविध अभ्यासांनुसार भारतात २० ते ३० टक्के पर्यटक योग शिकण्यासाठी येतात. ही मोठी संख्या आहे. गोव्यातही अनेक ठिकाणी योगवर्ग घेतले जातात आणि या ठिकाणी विदेशी पर्यटकही भेट दतात. पर्यटन खाते ‘करावन’ धोरण आणि ‘वारसा’ धोरणही आगामी काळात राबवणार आहे, अशी माहिती मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.