सिंधुदुर्ग – वैभववाडी तालुक्यातील देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे (धरणामुळे) बाधित झालेल्या बौद्धवाडी, कुर्ली येथील कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी कुर्ली ग्रामस्थांनी ३ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन चालू केले आहे.
देवघर धरणामुळे बाधित होत असलेल्या बौद्धवाडीतील सर्वच कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने केली. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष सूत्र म्हणून पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करावा, असा आदेश दिला होता. त्यानुसार प्रशासनाने वर्ष २०११ मध्ये तसा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर याविषयी वारंवार पाठपुरावा करूनही पुनर्वसनाविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सरकारच्या या उदासीन भूमिकेच्या विरोधात आणि पुनर्वसनाचा निर्णय तातडीने व्हावा, यासाठी पुन्हा एकदा धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे, असे या वेळी सांगण्यात आले.
संपादकीय भूमिका‘आधी पुनर्वसन, मग धरण (प्रकल्प), असे शासनाचे धोरण असतांना वर्षानुवर्षे प्रकल्पग्रस्तांना न्यायासाठी अर्ज, विनंत्या, आंदोलने का करावी लागतात ? याचे उत्तर सरकारने आणि लोकप्रतिनिधी यांनी जनतेला दिले पाहिजे. |