भाव, चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती देणारा सनातनचे १२४ वे संत पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांचा संत सन्मान सोहळा !

मूळ संभाजीनगर येथील आणि सध्या फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असलेले सनातनचे साधक श्री. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) हे २३ एप्रिल २०२३ या दिवशी १२४ व्या संतपदी (व्यष्टी संत) विराजमान झाले. त्यांच्या रूपाने सनातनच्या संतांच्या मांदियाळीत १२४ वे संतरत्न विराजमान झाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांच्या घरी अनौपचारिक भेट देऊन श्री. तिवारी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी साधलेल्या सहज संवादातून त्यांच्या आंतरिक साधनेचे रहस्य जाणून घेतले आणि त्याद्वारे त्यांचे संतपद घोषित केले. फोंडा येथील त्यांच्या निवासस्थानी हा संतसन्मान सोहळा पार पडला. या वेळी सनातनचे ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक आधुनिक पशूवैद्य अजय जोशी यांनी पू. तिवारीकाकांचा पुष्पहार घालून, तर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भेटवस्तू देऊन सन्मान केला. या वेळी पू. तिवारीकाकांच्या पत्नी सौ. सविता तिवारी, कन्या होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी आणि सनातनचे साधक उपस्थित होते. अकोला येथून पू. तिवारीकाकांच्या कनिष्ठ कन्या सौ. रासेश्वरी (भारती) लक्रस यांनी भ्रमणभाषद्वारे या सोहळ्याचा लाभ घेतला. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. तिवारीकाका यांच्याशी साधलेल्या या संवादातून उलगडलेले पू. तिवारीकाका यांचे उच्च विचार, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पू. तिवारीकाका यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. सत्यनारायण तिवारी यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. संतपद घोषित होण्यापूर्वी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री. सत्यनारायण तिवारी यांच्याशी साधलेल्या सहज संवादातून उलगडलेले श्री. तिवारी यांचे उच्च विचार !

अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पू. तिवारीकाका यांच्याशी अनौपचारिक बोलतांना त्यांच्या प्रकृतीविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी मुळीच रुग्णाईत नाही. मी पुष्कळ चांगला आहे. माझी प्रकृतीही पुष्कळ चांगली आहे.’’

आ. पू. तिवारीकाका म्हणाले, ‘‘मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) भेटलो. तेव्हा मला वाटले, ‘मला भगवंत भेटला.’ गुरुदेव साक्षात् भगवंतच आहेत ! मला ते प्रत्येक ठिकाणीच दिसतात.’’

इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. काकांना विचारले, ‘‘मृत्यूविषयी तुमचे काय विचार आहेत ?’’ त्यावर पू. काका म्हणाले, ‘‘मृत्यूविषयी मला एकच सांगायचे आहे, ‘आजचे जीवन चांगले घालवा. आनंदात (हसत) रहा. वर्तमानस्थितीत राहून जीवनाचा आनंद घ्यायला हवा.’ ‘माझा मृत्यू झाल्यानंतर माझ्या कुटुंबियांचे पुढे कसे होणार ?’, असे कुठलेही विचार माझ्या मनात येत नाहीत. मी त्यांची काळजी कशाला करायची ? जे होईल, ते होईल.’’

२. संतपद घोषित केल्यानंतर पू. सत्यनारायण तिवारी यांनी व्यक्त केलेले मनोगत  !

अ. ही सर्वकाही भगवंताची मोठीच कृपा आहे. धन्यवाद ! धन्यवाद भगवंता ! माझ्या जीवनाची नाव पैलतिरी लावलीस भगवंता ! भगवंता, मी धन्य झालो आहे !

आ. आधुनिक पशूवैद्य श्री. अजय जोशीकाका (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी पू. तिवारीकाकांचा हार घालून त्यांचा सन्मान केला. तेव्हा पू. तिवारीकाका म्हणाले, ‘‘मी पापी आहे. महापापी आहे. मला तुम्ही हार का घालत आहात ?’


निरपेक्षता, त्यागी वृत्ती आणि ईश्वराप्रती कृतज्ञताभाव असलेले फोंडा (गोवा) येथील श्री. सत्यनारायण रामअवतार तिवारी सनातनच्या १२४ व्या संतपदी विराजमान !

श्री. सत्यनारायण तिवारी

‘मूळचे संभाजीनगर येथील आणि आता गोव्यात वास्तव्यास असलेले श्री. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७४ वर्षे) पूर्वी सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे नोकरी करून जीवन जगत होते. लहानपणी पुष्कळ कष्ट भोगल्याने त्यांना नेहमी ‘समाजासाठी काहीतरी कार्य करावे’, असे वाटायचे; पण त्यांना समाजकार्य किंवा राजकारण इत्यादींमध्ये बरेच कटू अनुभव आले, तरीही त्यांनी स्वतःमधील प्रामाणिकपणा आणि नैतिकता सोडली नाही.

राजकारणात कटू अनुभव आल्यानंतर ते साधनेकडे वळले. त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यानंतर त्यांच्या विचारांत पालट झाला. आता त्यांना ‘सर्वकाही देवाच्या हातात आहे आणि जे होते, ते चांगल्यासाठीच !’, असे वाटून देवाप्रती कृतज्ञता वाटते.

एकदा माझी त्यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांना पाहून मला पुष्कळ आनंद झाला. त्यांना मेंदूचा आजार झाला असल्यामुळे त्यांना विस्मृती होते. ते मागील २ वर्षांपासून रुग्णाईत असून त्यांची शारीरिक स्थितीही बिकट आहे. त्यांचे सर्व जागेवरच करावे लागते. त्यांना अधिक वेळ बसता येत नाही आणि सुस्पष्टपणे बोलता येत नाही, तरीही त्यांनी माझ्याशी सहजतेने संवाद साधला. तो ऐकून ‘त्यांची शारीरिक स्थिती बिकट आहे’, असे कुणालाही वाटणार नाही. ते त्यांच्या पत्नीकडे (सौ. सविता तिवारी (वय ७२ वर्षे) यांच्याकडे) पत्नी म्हणून न पहाता ‘आई’ (म्हणजे शक्तीस्वरूप देवी) म्हणून पहातात. ते पत्नीला म्हणतात, ‘‘तुझ्यामुळे मला शक्ती मिळते.’’ ते पत्नीशी बोलतांना एखाद्या लहान मुलाप्रमाणे भासतात. त्यांची मनाची स्थिती शांत आणि समाधानी झाली आहे. ते सतत कृतज्ञताभावात रहातात. साधनेमुळे त्यांचे देवाशी असलेले अनुसंधान वाढल्याने त्यांच्यामध्ये ‘निरपेक्षता, व्यापकता, कर्तेपणा नसणे, त्यागी वृत्ती, मृत्यूची भीती नसणे’, असे अनेक गुण वाढले आहेत. ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्यासी जोडा ।’, ही प.पू. भक्तराज महाराज यांची भजनपंक्ती ते आचरणात आणत आहेत.

तिवारीकाका यांच्या पत्नी सौ. सविता तिवारी (वय ७२ वर्षे) आणि त्यांची मुलगी होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती सनातनच्या माध्यमातून साधना करत आहेत.

‘आजारपणात आनंदी आणि विरक्त जीवन कसे जगावे ?’, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणार्‍या श्री. सत्यनारायण तिवारीकाका यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. वर्ष २०१९ मध्ये त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. ‘निरागसता, देवाशी अखंड अनुसंधान आणि कृतज्ञताभाव’ इत्यादी अनेक गुणांमुळे आजच्या शुभदिनी त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक गाठली आहे अन् ते ‘व्यष्टी’ संत म्हणून सनातनच्या १२४ व्या संतपदावर विराजमान झाले आहेत.

‘पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी यांची पुढील आध्यात्मिक प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला निश्चिती आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२३.४.२०२३)

क्षणचित्रे

१. संतपद घोषित झाल्यानंतरही पू. तिवारीकाकांमध्ये पुष्कळ स्थिरता जाणवत होती. ते तेव्हाही भगवंताला पुढील प्रगतीसाठी प्रार्थनाच करत होते. त्यांची ही स्थिती पाहून उपस्थित साधकांची पुष्कळ भावजागृती झाली.

२. पू. काकांची शारीरीक स्थिती चांगली नसल्याने ते १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ बसू शकत नाहीत. त्यांना झोपूनच रहावे लागते. सोहळ्याच्या दिवशीही त्यांची शारीरीक स्थिती बरी नव्हती; परंतु तरीही ते श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी बोलत जवळजवळ १ घंटा बसले होते. त्या वेळी ‘जिवाच्या चैतन्यामध्ये वृद्धी झाल्यावर ते चैतन्यच शरिराला कार्यरत ठेवते आणि बळ देते’, असे लक्षात आले. (२३.४.२०२३)

पू. सत्यनारायण तिवारी यांनी साधकांना साधनेविषयी दिलेला संदेश !

भगवंताचे स्मरण करा. भगवंताचा नामजप करा. आनंदाने रहा आणि आनंदाने जगा.