एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न ! – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन विशेष संवाद’ : ‘समलैंगिकतेला सर्वोच्‍च न्‍यायालयात एवढे महत्त्व का ?’

मुंबई – भारतीय दंड विधानातील कलम ३७७ हटवल्‍यावर भारतात समलैंगिकतेला कायदेशीर मान्‍यता मिळाली. त्‍यानंतर आता त्‍या विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याच्‍या याचिका प्रविष्‍ट झाल्‍या आहेत. या याचिकांची नियमित सुनावणी होऊन त्‍या आता सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या घटनापिठाकडे वर्ग करण्‍यात आल्‍या आहेत.

अधिवक्‍ता सुभाष झा

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न चालू आहे. एरव्‍ही नियमित खटले, प्रलंबित निकाल देण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे वेळ नाही; मात्र समलैंगिकता विषयासाठी न्‍यायालयाकडे वेळ आहे. कुठले तरी चुकीचे कायदे आणून पती-पत्नीच्‍या पवित्र विवाहबंधनाला धोका निर्माण केला जात आहे. समलैंगिक विवाहाला मान्‍यता देऊन या देशाची आणखी अधोगतीकडे वाटचाल चालू होईल, याचा सरकार आणि समाज यांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा, असे प्रतिपादन सर्वोच्‍च न्‍यायालयाचे ज्‍येष्‍ठ अधिवक्‍ते सुभाष झा यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘समलैंगिकतेला सर्वोच्‍च न्‍यायालयात एवढे महत्त्व का ?’, या ‘ऑनलाईन विशेष संवादा’त ते बोलत होते.

समलैंगिकता हा घटनात्‍मक अधिकार होऊ शकत नाही ! – अधिवक्‍ता सुभाष झा

मुळात समलैंगिकता हा चर्चेचा विषय असूच शकत नाही; कारण समलैंगिकता हा समाजातील काही वर्गाला ग्रासलेला रोग आहे. ज्‍याप्रमाणे कोरोना महामारीसाठी सरकारने लस आणली, त्‍याप्रमाणे या रोगाने ग्रासलेल्‍यांना उपायांची आवश्‍यकता आहे. उद्या देशातील लाखो चोरांनी ‘चोरी करणे, हा आमचा घटनात्‍मक अधिकार आहे’, असे म्‍हटले, तर तो त्‍यांचा घटनात्‍मक अधिकार होऊ शकत नाही. तसेच समलैंगिकतेविषयी आहे. समलैंगिकतेच्‍या समर्थनार्थ न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट करणारे कोण आहेत ? याचा सरकारने शोध घ्‍यायला हवा.

पहा आणि इतरांनाही पहायला द्या – 

(सौजन्य : हिंदु जनजागृती समिती)

समलैंगिकतेला मान्‍यता देऊन पवित्र विवाहसंस्‍था आणि कुटुंबव्‍यवस्‍था यांवर चौफेर आघात केले जात आहेत ! – मीनाक्षी शरण, इतिहास अभ्‍यासक

सौ. मीनाक्षी शरण

समलैंगिकता ही रोम आणि ग्रीस देशांकडून आलेली विकृती आहे. यातूनच ‘एड्‍स’ या रोगाची उत्‍पत्ती झाली आहे. समलैंगिकतेला मान्‍यता देऊन पवित्र विवाहसंस्‍था आणि कुटुंबव्‍यवस्‍था यांवर चौफेर आघात केले जात आहेत. हिंदु धर्मात विवाहाच्‍या वेळी पुरुष आणि स्‍त्री यांच्‍या मीलनाला शिव-शक्‍तीचे मीलन मानले गेले आहे. धर्मात जे ४ ऋण सांगितले आहेत, त्‍यातील पितृऋण फेडण्‍यासाठी संततीची आवश्‍यकता असते. ती केवळ विवाहाच्‍या माध्‍यमातूनच साध्‍य होऊ शकते आणि त्‍यानेच धर्माचे योग्‍य पालन होऊ शकते. सध्‍याच्‍या भरकटलेल्‍या युवा पिढीला समलैंगिकतेच्‍या माध्‍यमातून दिशाहीन करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाने या अनैसर्गिक आणि चुकीच्‍या गोष्‍टींविरोधात लढा देण्‍याची आवश्‍यकता आहे.