आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना समान वेतन लागू करता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा आयुर्वेदाच्या डॉक्टरांना देता येत नाहीत !

नवी देहली – शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणारे वैद्य (आयुर्वेदिक डॉक्टर) हे आधुनिक वैद्यांच्या (अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांच्या) समकक्ष नाहीत, असे सांगत दोघांना समान वेतन लागू करण्याचा गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २६ एप्रिल या दिवशी रहित केला. अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा आयुर्वेदाच्या डॉक्टरांना देता येत नाहीत, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

आयुर्वेद व्यावसायिक हे एम्.बी.बी.एस्. पदवीधारक डॉक्टरांच्या समकक्ष मानले जाण्यास पात्र आहेत, असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने वर्ष २०१२ मध्ये दिला होता. त्यास आव्हान देणार्‍या याचिकांवरील सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने वरील निकाल दिला.

न्यायालयाने म्हटले की,

१. आयुर्वेद व्यावसायिकांचे महत्त्व आणि पर्यायी किंवा स्वदेशी औषध पद्धतीला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असले, तरी दोन्ही श्रेणींतील डॉक्टर समान वेतनास पात्र ठरण्यासाठी सारखे काम नक्कीच करत नाहीत, या वस्तूस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.

२. ‘दोन्ही पद्धती ज्या उपचार विज्ञानाचा अवलंब करतात, त्यांच्या स्वरूपामुळे आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अ‍ॅलोपॅथी डॉक्टर आकस्मिक कामे करण्यास सक्षम आहेत. त्यांनाच गंभीररित्या घायाळ झालेल्यांवर तातडीचे उपचार करावे लागतात. ते आयुर्वेदिक डॉक्टर करू शकत नाहीत.

३. एम्.बी.बी.एस्. पदवीधारक डॉक्टर हे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणार्‍या शल्यविशारदांना (‘सर्जन्स’ना) जसे साहाय्य करू शकतात, तसे करणे आयुर्वेदिक डॉक्टरांना शक्य नाही, याचाही खंडपीठाने उल्लेख केला.

संपादकीय भूमिका

  • मानवी जीवनातील ८० टक्के समस्यांमागील कारण हे आध्यात्मिक असते. त्यामुळे अनेक वेळा अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांच्या हाती अपयश लागते, तर प्रारब्ध, वाईट शक्ती, काळ (ज्योतिषशास्त्र) आदींचा अभ्यास असलेल्या आयुर्वेदिक डॉक्टरांना अचूक निदान करता येते. यामुळे ‘दोघे समकक्ष नाहीत’, ‘त्यांना समान वेतन देता येणार नाही’, हे ठरवतांना या सूत्रांचा विचार होणेही अपेक्षित !