आज आद्यशंकराचार्य यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
‘शके ७१० च्या वैशाख शुक्ल पंचमी या दिवशी अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात आसेतुहिमाचल दिग्विजय करून धर्मस्थापना करणारे अद्वितीय पुरुष आद्यशंकराचार्य यांचा जन्म झाला.
श्रीशंकराचार्य हे मलबारमधील (केरळ) एका नंबुद्री ब्राह्मणाच्या कुळात जन्मले. त्यांच्या आजोबांचे नाव विद्याधिराज असून ते स्वतः आचार्यांचे वडील शिवगुरु आणि आई आर्याम्बा असे सर्व जण कालटी येथे रहात असत. हे गाव कोचीन संस्थानांत पूर्णा उपाख्य पेरियर नदीच्या काठी असून त्याच्याभोवती गर्द वृृक्षराजी आहे. ‘५ व्या वर्षी मुंज, ८ व्या वर्षी संपूर्ण वेदाध्ययन, पूर्णा नदीत मगरीने पाय धरल्याच्या निमित्ताने आईकडून संन्यासग्रहणाची अनुमती, १० व्या वर्षी नर्मदातीरी ओंकारक्षेत्री गुरु गोविंदयती यांच्याकडून संन्यासग्रहण, ४ वर्षे बदरिकाश्रमी तपश्चर्या, १६ व्या वर्षी काशीक्षेत्री शारीरभाष्याची रचना, माहिष्मती येथे मंडनमिश्रादिकांचा वादविवादांत पराभव, शृंगेरीस शारदा मठाची स्थापना, भरतखंडभर दिग्विजय, काश्मीर येथे सरस्वतीपीठावर आरोहण, शृंगेरी मठावर सुरेश्वराचार्यांची स्थापना, कांची येथे कामाक्षीदेवीची स्थापना आणि शके ७४२ मध्ये तेथेच गुहाप्रवेश’, असा श्रीशंकराचार्यांचा संक्षिप्त चरित्रक्रम आहे.
भारतात बुद्ध-जैन पंथांचा उदय झाल्यापासून ब्रह्मविद्येचा लोप झाला होता. त्या ब्रह्मविद्येचा उद्धार शंकराचार्यांनी केला. शंकराचार्यांनी लोकांसाठी धर्मज्ञानाची पाणपोई घातली, हे त्यांचे मोठेच धर्मकृत्य होते. दुर्लभ ब्रह्मज्ञान त्यांनी सुलभ केले. ‘ब्रह्मसूत्रे’ आणि ‘भगवद्गीता’ यांवरील त्यांची भाष्ये प्रसिद्ध असून ईश, केन, कठ, प्रश्न, मंडूक, माण्डुक्य इत्यादी १२ उपनिषदांवरील त्यांच्या भाष्यामुळे ‘आचार्य’ ही पदवी सार्थ झाली आहे. त्यांच्या स्तोत्रातून भक्तीचा जिव्हाळा दिसून येतो. अद्वैत ब्रह्मज्ञान आणि कोमल भक्ती यांचा मधुर संगम शंकराचार्यांच्या स्तोत्रांतून झालेला आढळतो. त्यांचा अद्वैतबोध रूक्ष आणि नीरस नाही, तर तो भक्तीने आर्द्र झालेला आहे. ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः।’ या श्लोकात शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान भरून राहिले आहे.’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))