मूळ संभाजीनगर येथील आणि आता गोव्‍यात वास्‍तव्‍यास असलेले श्री. सत्‍यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) सनातनच्‍या १२४ व्‍या संतपदी विराजमान !

पू. सत्‍यनारायण तिवारी

फोंडा (गोवा) – मूळ संभाजीनगर येथील आणि सध्‍या फोंडा, गोवा येथे वास्‍तव्‍यास असलेले सनातनचे साधक श्री. सत्‍यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) हे २३ एप्रिल २०२३ या दिवशी व्‍यष्‍टी संतपदी विराजमान झाले. त्‍यांच्‍या रूपाने सनातनच्‍या संतांच्‍या मांदियाळीत १२४ वे संतरत्न विराजमान झाले. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या एक आध्‍यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्‍यांच्‍या घरी अनौपचारिक भेट देऊन श्री. तिवारी यांच्‍याशी संवाद साधला. त्‍यांच्‍याशी साधलेल्‍या सहज संवादातून त्‍यांच्‍या आंतरिक साधनेचे रहस्‍य जाणून घेतले आणि त्‍याद्वारे त्‍यांचे संतपद घोषित केले.

पू. सत्‍यनारायण तिवारी हे गेल्‍या २ वर्षांपासून तीव्र शारीरिक त्रासांमुळे रुग्‍णाईत असल्‍यामुळे त्‍यांना सतत झोपून रहावे लागते, तसेच त्‍यांना मेंदूच्‍या आजारामुळे विस्‍मृतीही होते. अशा स्‍थितीतही त्‍यांनी आंतरिक साधनेच्‍या बळावर सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेने संतपद गाठले. फोंडा येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानी हा संतसन्‍मान सोहळा पार पडला. या वेळी सनातनचे ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे साधक आधुनिक पशूवैद्य अजय जोशी यांनी पू. तिवारीकाकांचा पुष्‍पहार घालून, तर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भेटवस्‍तू देऊन सन्‍मान केला. या वेळी पू. तिवारीकाकांच्‍या पत्नी सौ. सविता तिवारी, कन्‍या होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी आणि सनातनचे साधक उपस्‍थित होते. अकोला येथून पू. तिवारीकाकांच्‍या कनिष्‍ठ कन्‍या सौ. रासेश्‍वरी (भारती) लक्‌र्स यांनी भ्रमणभाषद्वारे या सोहळ्‍याचा लाभ घेतला.

सविस्‍तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत