२३ एप्रिल २०२३ या दिवशी पंजाबमधील ‘वारिस पंजाब दे’ (पंजाबचे वारसदार) या खलिस्तानी संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याला पोलिसांनी येथील रोडे गावातील भिंद्रनवाले गुरुद्वारातून अटक केली. हे गाव खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचे जन्मगाव आहे. जरी अमृतपाल सिंह याला अटक करण्यात आली असली, तरी खलिस्तानी विचार हे भारतासह ब्रिटन, कॅनडा अशा विविध देशांमध्येही दिसून येतात. त्यामुळे एकेक खलिस्तानी आतंकवाद्याला अटक करण्यापेक्षा त्यांची चळवळ आणि त्यांचे विचार यांच्या मुळावरच घाव घातला पाहिजे, याविषयी विवेचन करणारा लेख येथे देत आहोत.
१. खलिस्तानी विचारांना जन्म देणे आणि त्यांचे पोषण करणे यांमध्ये विदेशी शक्तींचा हात !
‘पळपुट्या अमृतपाल सिंहमुळे खलिस्तानचे सूत्र परत एकदा चर्चेत आले आहे. हे सूत्र कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रकट झाल्याखेरीज रहात नाही. शेवटी ‘खलिस्तानचे रक्तबीज मुळापासून का नष्ट होत नाही ?’, हा प्रश्न अमृतपाल आणि त्याचे समर्थक यांच्यावर झालेल्या अलीकडील कारवाईमुळे समोर आला आहे. तसे सर्वच राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या कारवाईचे समर्थन केले असले, तरी अकाली दल मात्र दबक्या स्वरात त्याचा विरोध करत आहे.
दुसरीकडे शिखांच्या ५ तख्तांमध्ये सर्वांत जुना असलेल्या अमृतसर येथील श्री अकाल तख्त साहिब समवेतच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीनेही ‘अटक झालेले तरुण न सुटल्यास ते पुढील योजनेवर काम करतील’, अशी सरकारला चेतावणी दिली आहे. या संपूर्ण घटनाक्रमाच्या अनुषंगाने दोन गोष्टी स्पष्ट होतात. प्रथम खलिस्तानविरोधी अभियानामुळे पंजाब जवळजवळ अप्रभावित आणि शांत आहे. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये बसलेल्या कट्टरपंथियांनी तेथील काही भारतीय दूतावासांवर किंवा मंदिरांवर केलेल्या आक्रमणांची प्रकरणे समोर आली. दुसरे म्हणजे खलिस्तानी विचारांची मुळे भारतातच असून त्यांना जन्म देणे आणि त्यांचे पोषण करणे यांमध्ये विदेशी शक्तींचा हात आहे.
२. पंजाबमध्ये परत कलंकित इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?
वर्ष १९८० च्या दशकात काय झाले, हे सुप्रसिद्ध आहे. पंजाबमध्ये अकाली दलाला संपवण्यासाठी इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांनी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याला उत्तेजन दिले; पण ते त्याला नियंत्रित करू शकले नाहीत. खलिस्तानची कल्पना विदेशी आहे आणि त्याला १०० टक्के भारतीय शिखांचे समर्थन नाही. त्यामुळे भिंद्रनवालेच्या निर्देशांवरून निरपराध हिंदूंसमवेत राष्ट्रभक्त शिखांच्याही ओळख पटवून हत्या केल्या जाऊ लागल्या. यातून पंजाबमध्ये हिंदु आणि शीख यांच्यात भिंद्रनवालेविषयी आक्रोश वाढला.
राजकीय लाभासाठी काँग्रेसची ‘फोडा आणि राज्य करा’, या धोरणाची परिणती दोन सैन्य अभियानांच्या रूपात झाली. यात सुवर्ण मंदिराची मर्यादा भंग झाली. त्यामुळे भाविकांच्या मनाला गंभीर आघात पोचला. त्यामुळेच इंदिरा गांधी यांची त्यांच्या २ शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्याच्या प्रत्युत्तरादाखल काँग्रेस प्रायोजित नरसंहारात केवळ देहली राजधानी क्षेत्रातच सहस्रो निरपराध शिखांची हत्या करण्यात आली. या कलंकित इतिहासाला यासाठी आठवावे लागते; कारण ज्या ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल आणि त्याचे समर्थक यांच्याविषयी अकाल तख्त अन् अकाली दल सहानुभूती ठेवत आहेत, ते त्यांना परत पंजाबला त्याच रक्तरंजित काळात परत घेऊन जाऊ इच्छितात का ? अमृतपाल १९ वर्षांचा असतांना दुबईला गेला. तोपर्यंत त्याने ना शीख पंथाची विधीवत् दीक्षा (अमृत छकना) घेतली होती, ना गुरुपरंपरेनुसार केस ठेवले. तो दाढीही कापत असे.
३. ‘खलिस्तानच्या वैचारिक अधिष्ठाना’च्या विरोधात लढाई करणे आवश्यक !
असे म्हटले जाते की, फुटीरतावादी विचारांनी प्रभावित अमृतपालचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि अन्य भारतविरोधी शक्ती यांच्याशी संपर्क आला. २५ सप्टेंबर २०२२ या दिवशी भारतात परतल्यावर त्याने आनंदपूर साहिबमध्ये सर्वप्रथम ‘अमृत छकने’ हा विधी केला. त्यानंतर त्याने भिंद्रनवालेसारखा वेश स्वीकारला. धार्मिक अवज्ञा केल्याच्या गंभीर आरोपाव्यतिरिक्त अमृतपालवर जी गुन्हेगारी प्रकरणे नोंदवली आहेत, त्यात त्या २३ फेब्रुवारी २०२३ या दिवशीच्या अजनाला पोलीस ठाण्यावरील आक्रमणाच्या प्रकरणाचाही समावेश आहे. ज्यात ‘गुरु ग्रंथसाहिब’ यांची ढाल बनवून शीख मर्यादेवर आघात करण्यात आला होता. असे वागणे खर्या शिखाला मान्य होईल का ? खलिस्तानविषयीची चर्चा विविध स्वरूपात आणि मोठ्या प्रमाणात देशासमोर येत रहाते. ते यासाठी की, एक राष्ट्र म्हणून आपण खलिस्तान समर्थकांच्या विरोधात लढत असतो; परंतु त्याच्या विषारी विचारांना उद़्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत नाही. भारताने खलिस्तान समर्थकांच्या बरोबरीने ‘खलिस्तानच्या वैचारिक अधिष्ठाना’च्या विरोधातही लढाई केली पाहिजे.
४. भारतावर दीर्घकाळ राज्य करण्यासाठी इंग्रजांकडून हिंदू आणि शीख यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न
खलिस्तानची मागणीही अनुमाने १५० वर्षे जुनी आहे. इंग्रजांना वर्ष १८५७ च्या बंडाची पुनरावृत्ती नको होती. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांनी ‘फोडा आणि राज्य करा’, हे विभाजनकारी धोरण अवलंबले. त्यांनी भारतीय समाजाच्या कमकुवत कड्या ओळखून बौद्धिक आणि शैक्षणिक स्तरावर काम केले. तेव्हा हिंदु आणि शीख यांच्यामध्ये कडवटपणा निर्माण करणे इंग्रजांसाठी सर्वांत कठीण गोष्ट होती; कारण शीख पंथाच्या जन्मापासूनच देशाचा प्रत्येक हिंदु हा शीख गुरूंविषयी श्रद्धाभाव ठेवतो, तर गुरुपरंपरेतून आलेला प्रत्येक शीख स्वत:ला धर्म आणि देश यांचा रक्षक समजतो. इंग्रजांनी आयर्लंडमध्ये जन्मलेला मॅक्स आर्थर मॅकालिफ या अधिकार्याला वर्ष १८६० च्या जवळपास एका षड्यंत्राच्या अंतर्गत शीख म्हणून समोर आणले. त्याने विकृत चर्चेच्या आधारे हिंदु आणि शीख यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचा बहुतांश हिंदू आणि शीख यांच्यावर परिणाम झाला नाही; परंतु शीख पंथाचा एक वर्ग त्याच्या प्रभावात आला. त्याचा मोठा विस्तृत आणि काळा इतिहास आहे. याच विचाराला शीख पंथाचा अतिशय लहान; पण अग्रगण्य वर्ग पाकिस्तानच्या समर्थनार्थ पुढे जात आहे.
५. खलिस्तानच्या नकाशात शिखांचे पवित्र तीर्थक्षेत्र श्रीनानकाना साहिब आणि लाहोर यांचा उल्लेख नाही !
दुसर्या देशांमधून चालवण्यात येणारा खलिस्तानचा अजेंडा (कार्यसूची) किती खोटा आहे, हे त्याच्या प्रस्तावित कपटी नकाशावरून स्पष्ट होते. खलिस्तान समर्थक भारतातील पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेश यांच्या जिल्ह्यांचा समावेश करतात; पण जेथे शीख पंथाचे संस्थापक श्री गुरुनानक देव यांचा जन्म झाला होता, ते पवित्र श्रीनानकाना साहिब आणि जेथे शिखांची अनेक पवित्र तीर्थस्थळे आहेत अन् महाराजा रणजीत सिंह यांची राजधानी होती, ते लाहोर यांचा उल्लेखही करत नाहीत.
६. हिंदु धर्म आणि देशभरातील तीर्थक्षेत्रे यांच्यापासून शीख पंथाला वेगळे करणे अशक्य !
शीख गुरूंची पवित्र परंपरा केवळ भारतासाठी नाही, तर समस्त मानव कल्याणासाठी आहे. त्याला कोणते भौगोलिक क्षेत्र किंवा पंथ यांच्यापर्यंत मर्यादित करता येत नाही. शिखांचे १० वे गुरु गोविंदसिंह यांचा जन्म बिहारच्या पाटलीपुत्रमध्ये (पाटणा) झाला होता आणि धर्माचे रक्षण करतांना त्यांनी महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये बलीदान दिले. अन्य २ शीख गुरु गुरु हरकिशन देव आणि गुरु तेगबहाद्दूर यांनी देहलीमध्ये शेवटचा श्वास घेतला. पंजाबहून कितीतरी अधिक गुरुद्वारे पंजाबच्या बाहेर आहेत. ज्यांच्याविषयी हिंदु समाजाचीही श्रद्धा आहे. वर्ष १६९९ मध्ये गुरु गोविंदसिंह यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती. ज्यामध्ये पहिले ५ खालसा (पंज प्यारे) देशाच्या चारही कोपर्यांमध्ये होते.
यात उत्तर भारतातून दया सिंह (पंजाब) आणि धरम सिंह (उत्तरप्रदेश), पूर्व भारतातून हिंमत सिंह (ओडिशा), पश्चिम भारतातून मोहकम सिंह (गुजरात) आणि दक्षिण भारतातून साहिब सिंह (कर्नाटक) होते. कोणत्याही पंथाशी जोडलेल्या आणि देशभर पसरलेल्या या तीर्थस्थळांपासून शीख पंथ वेगळा कसा करता येऊ शकेल ?
– बलवीर पुंज, माजी खासदार, राज्यसभा
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, हिंदी)
संपादकीय भूमिकादेशभरात शीख पंथाची तीर्थस्थळे असतांना वेगळे राष्ट्र मागणार्या खलिस्तानवाद्यांची नांगी ठेचणे आवश्यक ! |