उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी !
मुंबई – महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या भाविकांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. २४ एप्रिल या दिवशी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन याविषयीचे निवेदन दिले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत यांसह या गटाचे सर्व आमदार, काही पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. ही दुर्घटना मानवनिर्मित होती. राज्य सरकार सत्य परिस्थिती दडवण्याचा प्रयत्न करत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करणारी आहे. त्यामुळे या घटनेमागील सत्य परिस्थिती जनतेपुढे येणे आवश्यक आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. खारघर येथे झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित भाविकांतील १४ जणांचा मृत्यू झाला होता. याचे अन्वेषण करण्यासाठी सरकारने एक समिती गठीत केली आहे.