बरेली (उत्तरप्रदेश) येथील कारागृहात अतिक याला अवैधरित्या भेटले होते ९ गुंड !

या भेटीनंतर १३ दिवसांनी झाली होती उमेश पाल यांची हत्या !

उजवीकडे अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ

बरेली (उत्तरप्रदेश) – कुख्यात गुंड अतिक अहमद याला येथील कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या गुंडांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर उमेश पाल यांची प्रयागराज येथे हत्या करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. ११ फेब्रुवारी २०२३ या दिवशी अतिकचा मुलगा असद, गुड्डू मुस्लिम आणि अन्य ७ गुंड अतिक याला भेटण्यासाठी या कारागृहात गेले होते. येथे ते २ घंटे अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना भेटले. यात भेटीत आमदार राजू पाल यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला आणि २४ फेब्रुवारीला त्यांची हत्या झाली, अशी पोलिसांना माहिती मिळाली आहे. हे सर्व ९ जण कारागृहात अतिकला भेटण्यासाठी आल्याचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांना सापडले आहे. हे चित्रण संगणकाच्या सर्व्हरमधून पोलिसांनी मिळवले आहे; म्हणजे ते कुणीतरी पुसून टाकले होते. (कारागृहातील सीसीटीव्हीमधील चित्रीकरण कोणी पुसून टाकले ? याचा अर्थ कारागृहात तैनात असलेल्या पोलिसांचे गुंडांशी साटेलोटे आहे, हेच स्पष्ट होते ! – संपादक) तसेच ‘कारागृहात एकावेळी केवळ ३ जणांना आणि तेही केवळ ३० मिनिटे भेटण्याची नियमानुसार अनुमती असतांना ९ जण २ घंटे कसे भेटले ?’, याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच हे सर्व जण अतिक याच्या ओळखपत्राद्वारे कारागृहात आले होते. त्यांची कुठलीही नोंद ठेवण्यात आली नव्हती. या ९ पैकी ८ जण उमेश पाल यांच्या हत्येत सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ४ जणांना आतापर्यंत चकमकीत ठार करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका 

भ्रष्ट पोलिसांमुळे कारागृह म्हणजे गुंडांचे अड्डे झाले आहेत. देशातील बहुतेक कारागृहांची हीच स्थिती आहे. ‘गुंडाला अटक करून कारागृहात टाकले, तर त्याच्या कारवाया थांबतात’, असे म्हणता येत नाहीत, हेच समोर येत आहे ! याकडे आता केंद्रशासनाने गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.