समाजातील संतांचे अयोग्य दृष्टीकोन आणि त्यांच्या आश्रमांतील दुःस्थिती !

‘एका कुंभमेळ्यामध्ये मला एका संतांकडे २ मास त्यांच्या आश्रमाचे व्यवस्थापन पहाण्याची सेवा मिळाली होती. तेव्हा गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने समाजातील संतांची दुःस्थिती माझ्या लक्षात आली. ती लिहून श्री गुरूंच्या श्री चरणी अर्पण करत आहे.

कु. पूनम चौधरी

१. संतांकडे केल्या जाणार्‍या यज्ञांसाठी पुष्कळ व्यय होणे

संत असलेल्या ठिकाणी मोठमोठे यज्ञ केले जातात. ज्या ठिकाणी एखादा यज्ञ होतो. तेव्हा तेथे एकदा वापरलेले साहित्य अन्य ठिकाणी वापरले जात नसे. त्या यज्ञांचा एकूण व्यय (खर्च) कोट्यवधी रुपयांचा असतो. त्यात काटकसरीपणा नसल्यामुळे विनावापर साहित्य पडून रहात असे. त्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक पैसे असेच वाया जात होते. प्रत्येक यज्ञासाठी लागणारे साहित्य ते नव्याने विकत आणत.

२. संतांनी देवतांच्या होणार्‍या विडंबनाला लहान गोष्ट समजून त्याकडे दुर्लक्ष करणे

त्यांच्याकडे भोजनासाठी कागदी ताटल्या (डिस्पोजेबल डिश – या डिश एकदा वापरल्यावर टाकून देतात.) मागवल्या होत्या. त्या ताटलीवर श्री हनुमान ‘संजीवनी बुटी’ घेऊन येत असल्याचे चित्र होते. त्या वेळी मी त्या महाराजांना ते चित्र दाखवून सांगितले, ‘‘अशा ताटल्या वापरल्यास देवतेचे विडंबन होते.’’ तेथे येणार्‍या व्यक्ती त्या ताटलीत भोजन करतात आणि उष्टे करून फेकून देतात. ज्या ताटलीवर श्री हनुमानाचे चित्र होते, त्या ताटल्या कचर्‍यात फेकण्यात येत होत्या. तेव्हा त्यावर त्या संतांनी म्हटले, ‘‘अशा लहान-सहान गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाही.’’

३. स्वामींचे असभ्य वर्तन

तेथे जे स्वामी रहातात, ते चित्रपटातील गाणी म्हणतात, तसेच एकमेकांशी बोलतांना ते अपशब्दांचा वापर आणि एकमेकांची थट्टा – मस्करी करतात. त्यांच्या पाठशाळेत शिकणारे विद्यार्थी आणि तेथील स्वामी एकमेकांची मस्करी करतात.

४. शिष्यगणांनी सेवेनिमित्त मिळालेल्या दक्षिणेविषयी प्रतिक्रिया देणे

तेथील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर ते स्वामीजी आपल्या शिष्यांना दक्षिणा देतात. त्यांचे शिष्य प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणत होते, ‘‘आम्ही एवढ्या दिवसांपासून सेवा करत आहोत, तरीही एवढी अल्प दक्षिणा दिली किंवा अन्य शिष्याच्या तुलनेत मला किती अल्प मिळाली आहे.’’ तेथे सेवेसाठी जे कुणी येतात, त्या सर्वांना दक्षिणा देण्यात येते.

५. ‘सेवाभावाने साधना म्हणून सर्व करत आहे’, असे साधिकेने संतांना सांगणे

मी तेथे सेवा करून येत होते. तेव्हा त्या संतांनी मला विचारले, ‘‘तुमची दक्षिणा किती आहे ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मी हे सर्व सेवाभावाने करते. ‘ही माझी साधना आहे’, असे समजून मी ही सेवा करते.’’

६. संतांनी दिलेले अयोग्य दृष्टीकोन

६ अ. प्रत्येक कृतीचे कर्तेपण ईश्वराला अर्पण करण्याविषयी संतांचा अयोग्य दृष्टीकोन : मी किती सेवा करते, याचे महाराजांना कौतुक वाटत होते. त्या वेळी मी त्यांना सांगितले, ‘‘सर्वकाही ईश्वरच करत असतो.’’ त्यावर त्यांनी म्हटले, ‘‘तू करतेस म्हणून ते होते. ईश्वर येथे येऊन प्रत्यक्ष करतो का ?’’ (प्रत्येक कृतीचा कर्तेपणा ईश्वराला अर्पण करायचा, ही शिकवण आम्हाला गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) दिली आहे; परंतु त्या संतांचे या शिकवणीप्रती अज्ञान आणि वेगळाच दृष्टीकोन आहे.

६ आ. ‘तुमच्याकडे एखादे पद किंवा अधिकार असेल, तरच लोक तुमचे ऐकतील’, असा अयोग्य दृष्टीकोन देणे : सेवा पूर्ण झाल्यानंतर ‘मला परत जायचे आहे’, असे मी त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आमच्या येथे स्त्रियांची एक संस्था आहे. त्या संस्थेच्या गादीवर मी तुम्हाला बसवतो. जेव्हा तुमच्याकडे एखादे पद किंवा अधिकार असेल, तरच लोक तुमचे ऐकतील.’’ मी त्यांना सांगितले, ‘‘मी जी काही सेवा येथे केली आहे. ती सर्व मी गुरुकृपेने शिकले आहे आणि ही सेवा म्हणजे गुरूंचा प्रसाद आहे.’

या प्रसंगात ‘ज्याप्रमाणे नर्मदेच्या किनारी बसलेल्या गुरूंना वाटते की, मला एकतरी खरा शिष्य मिळावा आणि त्यासाठी ते प्रतीक्षा करत असतात. त्याच प्रकारची आज समाजाची स्थिती झाली आहे की, एवढे सर्व झाल्यानंतरही त्यांना एकही खरा शिष्य मिळू शकत नाही’, असे माझ्या लक्षात आले.

७. शिष्यांनी केलेल्या अयोग्य कृती

७ अ. शिष्यांनी संतांच्या आश्रमातील वातानुकूलित यंत्रे कुणाला न विचारता विकणे आणि त्याचे अधिक मिळालेले पैसे स्वतःकडे ठेवणे : तेथे उन्हाळ्यामुळे उकडत असल्याने त्यांनी वातानुकूलित यंत्र विकत घेतले होते. सर्व सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांचे शिष्य तेथील वातानुकूलित यंत्र विकत होते. त्यांनी महाराजांना यंत्राचे मूल्य न्यून सांगितले होते; परंतु ते शिष्य लोकांकडून प्रत्यक्षात अधिक मूल्य घेऊन विकत होते. उरलेले पैसे ते स्वतःजवळ ठेवत होते.

७ आ. शिष्यांच्या स्वार्थीपणामुळे अन्य कुणाला झोपण्यासाठी गादी उपलब्ध न होणे : त्या संतांकडे जे शिष्य येतात, ते केवळ स्वतःचाच विचार करत असत. एका खोलीमध्ये दोघे जणच रहात होते; परंतु त्यांनी त्यांच्याकडे ५ – ६ अतिरिक्त गाद्या घेऊन ठेवल्या होत्या. ‘आपल्या परिचयातील जवळचे कुणी कुंभमेळ्याला आले, तर त्यांना गादी मिळाली पाहिजे’, असा ते विचार करत होते. त्यामुळे इतर दुसरे कुणी आले, तर त्यांना गादी मिळत नसे.

७ इ. त्यांच्या पाठशाळेतील विद्यार्थ्यांच्या खोल्या अत्यंत अस्वच्छ होत्या.

८. शिष्यांच्या आर्थिक स्थितीवरून त्यांच्या रहाण्यामध्ये भेदभाव केला जाणे

ज्या शिष्याकडे अधिक पैसे असत, त्याची रहाण्याची व्यवस्था वेगळी केली जात असे. जे सर्वसामान्य शिष्य असत, त्यांच्या रहाण्याची व्यवस्था वेगळी असायची.

९. तेथे प्रतिदिन जे भोजन सिद्ध केले जायचे, ते पुष्कळ अधिक प्रमाणात बनवत असल्यामुळे त्यातील पुष्कळसा महाप्रसाद वाया जात होता.

१०. पूजा आणि पठण भावपूर्ण न करता केवळ उरकणे

या संप्रदायात पूजा करतात. ती पूजा भावपूर्ण करण्यापेक्षा लवकर कशी पूर्ण होईल ? याकडे सर्वांचे अधिक लक्ष असायचे, उदा. ते म्हणायचे, ‘‘आम्ही २१ वेळा हनुमान चालिसाचे पठण करतो.’’ ते पठण एवढ्या घाईघाईने म्हटले जायचे की, त्यामध्ये भाव मुळीच नसायचा. त्यांचे पूर्ण लक्ष ‘ते पठण लवकरात लवकर कसे पूर्ण होईल ?’, याकडेच असायचे.

११. महाराजांना साहित्य वाया जात असल्याची सूत्रे सांगितल्यावर त्यांना पुष्कळ आश्चर्य वाटणे

समाजाची ही स्थिती पाहून ‘धनाचा अपव्यय कशा प्रकारे होतो ?’, हे माझ्या लक्षात आले. त्या महाराजांना मी साहित्य वाया जात असल्याची सूत्रे सांगितल्यावर त्यांना पुष्कळ आश्चर्य वाटले. मी त्यांना सांगितल्यानुसार तसे करण्याचा ते प्रयत्नही करत होते, उदा. जसे गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आपल्याला शिकवले आहे की, प्रत्येक साहित्य खोक्यात ठेवून त्यावर ‘लेबल’ लावले पाहिजे. ते चांगल्या प्रकारे झाकून ठेवले पाहिजे. माझ्याकडून गुरुदेव तेथेही तशाच प्रकारे सेवाही करवून घेत होते.

१२. प.पू. गुरुदेवांचे दैवी गुण साधकांमध्ये पाहून महाराजांनी म्हटले, ‘‘ज्या वृक्षाची फळे एवढी चांगली आहेत, तर तो वृक्ष किती चांगला असेल !’’

गुरुदेवांच्या कृपेनेच मला ही सर्व सूत्रे शिकायला मिळाली. यासाठी मी हे लिखाण गुरुदेवांच्या श्री चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.’

– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र, देहली. (६.७.२०२२)