‘शिलान्यास’ विधीचा विधीतील घटकांवर सकारात्मक परिणाम होणे !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सौ. मधुरा कर्वे

‘कोणत्याही वास्तूनिर्मितीचा आरंभ करण्यापूर्वी भूमीपूजनाच्या नंतर ‘शिलान्यास’ हा विधी करतात. यात एकूण बांधकामाच्या आग्नेय कोपर्‍यात खड्डा खणून, एकावर एक अशा दोन शिळांची स्थापना करतात. त्यापैकी खालील शिळेमध्ये (१ ल्या) मध्यभागी एक गोल खड्डा करून त्यात पंचगव्य, शेवाळं, सप्तधान्ये, पंचरत्ने, भात इत्यादी वस्तू घालतात. तसेच दुसर्‍या (वरच्या) शिळेवर ‘स्वस्तिक’चे चिन्ह कोरलेले असते. ही दुसरी शिळा पहिल्या शिळेवर ठेवतात.

एप्रिल २०२२ मध्ये गोवा येथे एका आध्यात्मिक संस्थेच्या भूमीवर बांधकामास आरंभ करण्यापूर्वी शिलान्यास विधी करण्यात आला. ‘शिलान्यास विधीचा विधीतील घटकांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत विधीपूर्वी संतांनी दोन्ही शिळांना हस्तस्पर्श करण्यापूर्वी आणि हस्तस्पर्श केल्यानंतर शिळांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. तसेच विधीपूर्वी आणि विधीनंतर शिलान्यास केलेली जागा अन् पुरोहित यांच्याही चाचण्या करण्यात आल्या.

१ अ. शिलान्यास विधीचा विधीतील घटकांवर सकारात्मक परिणाम होणे : विधीपूर्वी संतांनी शिळांना हस्तस्पर्श केल्यावर शिळांतील नकारात्मक स्पंदने नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ वाढ झाली. या दोन्ही शिळांचे पूजन केल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. विधीनंतर शिलान्यास केलेल्या जागेतील नकारात्मक स्पंदने पुष्कळ अल्प होऊन तिची सात्त्विकता पुष्कळ वाढली. विधीनंतर पुरोहितांतील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्यांची सात्त्विकता वाढली. हे बाजूला दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. संतांनी दोन्ही शिळांना हस्तस्पर्श केल्यावर शिळांतील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढणे : संतांमध्ये पुष्कळ चैतन्य कार्यरत असते. त्यामुळे संतांनी दोन्ही शिळांना हस्तस्पर्श केल्यावर त्यांच्या हातांतून शिळांमध्ये पुष्कळ चैतन्य संक्रमित झाले. परिणामी शिळांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण नष्ट होऊन त्यांच्यातील सात्त्विकता पुष्कळ वाढली. त्यानंतर पुरोहितांनी दोन्ही शिळांचे पूजन केले आणि पूजनामुळे शिळांतील चैतन्य कार्यरत झाले.

२ आ. शिलान्यास विधीनंतर तेथील जागेची सात्त्विकता पुष्कळ वाढणे : एखाद्या वास्तूची निर्मिती करतांना विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बांधकाम पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो. शिलान्यास विधी केल्याने देवतांचे आशीर्वाद मिळून बांधकाम निर्विघ्नपणे पूर्ण होण्यास साहाय्य होते. चाचणीतील आध्यात्मिक संस्थेच्या जागेमध्ये विधीपूर्वी सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अल्प आणि त्रासदायक स्पंदनांचे प्रमाण अधिक होते. शिलान्यास विधीनंतर जागेतील त्रासदायक स्पंदने पुष्कळ प्रमाणात अल्प होऊन तिची सात्त्विकता पुष्कळ वाढली. यातून हिंदु धर्माने सांगितलेल्या शिलान्यास विधीचे महत्त्व लक्षात येते.

२ इ. शिलान्यास विधी केल्याने पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : पुरोहितांनी विधीतील चैतन्य ग्रहण केल्याने त्यांच्याभोवती असलेले त्रासदायक स्पंदनांचे आवरण पुष्कळ अल्प होऊन त्यांची सात्त्विकता वाढली.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.२.२०२३)

ई-मेल : [email protected]