‘सध्या भारतात गाजत असलेले मंदिर प्रवेश आणि मंदिरांशी संबंधित वाद (गर्भगृहात प्रवेश किंवा व्यवस्थापनात नियुक्ती इत्यादी) यांवर विविध माध्यमांमधून दोन्ही बाजूंनी चर्चा होत आहेत. यासंदर्भात न्यायालयाचे काही निवाडेही आले आहेत. हिंदूंच्याच मंदिरांविषयी ही स्थिती येण्यामागे काही कारणे आहेत. त्याला अन्य कुणी नाही, तर आपण सर्व हिंदु बांधवच उत्तरदायी आहोत, असे माझे स्पष्ट मत आहे.
१. हिंदूंनी ‘भक्त’ म्हणून नाही, तर ‘पर्यटक’ म्हणून मंदिरांना भेटी देणे
सध्या मंदिरांमध्ये ‘भक्त’ बनून जाण्याऐवजी ‘पर्यटक’ म्हणून जाण्याची नवीन परंपरा चालू झाली आहे. हे लक्षात घेऊन अनेक हिंदु मंदिरे ‘पर्यटनस्थळ’ म्हणून घोषित झाली आहेत. अर्थातच हे पर्यटक मंदिरात बसून ईश्वराचे ध्यान करण्यापेक्षा परिसरात ‘सेल्फी’ काढण्यात मग्न असतात. त्यांना त्या मंदिरातील देव किंवा संत यांच्याविषयी जाणून घेण्यात रस नसतो. त्याऐवजी ते अन्य गोष्टींत रममाण झालेले असतात.
२. मंदिरांमध्ये मंदिरांच्या स्थापत्यशास्त्राविषयी माहितीचा अभाव
प्राचीन मंदिरांमध्ये त्यांचे स्थापत्यशास्त्र किंवा इतिहास यांविषयी माहिती दिलेली नसते. त्याऐवजी अनेक लहान मोठ्या राजकीय नेत्यांचे फलक मंदिरांच्या चहुकडे पहाता येतात. मंदिराच्या परिसरात असलेले दुकानदार त्यांच्या दुकानांमधून पान, गुटखा, सिगारेट यांची विक्री करतात.
३. धर्मशाळांच्या ठिकाणी ‘लॉज’ उदयास येणे
पूर्वीच्या काळी मंदिरांच्या परिसरात धर्मशाळा बांधलेल्या असायच्या. त्यामध्ये पांथस्थ मंडळी किंवा भक्त यांच्या रहाण्याची सोय केलेली असायची. त्या ठिकाणी भक्त आनंदाने रहात होते. त्या काळात तेथे पारायण सप्ताह चालायचे. त्या निमित्ताने ते ईश्वराची सेवा करायचे. या धर्मशाळांच्या ठिकाणी आता ‘लॉज’ निर्माण झाले आहेत. तेथे पर्यटक वातानुकूलित खोली, डबल बेड, दूरचित्रवाणी संच आदी गोष्टींची विचारणा करतात. खर्या भक्ताला या सर्व सोयीसुविधा नसल्या तरी चालतात.
४. हिंदूंकडून भक्त निवासाचा चुकीचा वापर
‘भक्त निवास’ हा भक्तांसाठी असतो’, याचा अनेकांना विसर पडलेला आहे. अनेक तरुण नवविवाहित जोडपे मधुचंद्रासाठी भक्त निवासाचा वापर करत असल्याचे लक्षात आले आहे. काही भक्त निवासामध्ये तरुण-तरुणींच्या आत्महत्येच्या घटना घडल्याची वृत्ते वाचायला मिळाली आहेत. (ते पती-पत्नी नव्हते, तर घरातून पलायन करून आलेले प्रेमीयुगल होते.)
५. मंदिरांच्या अनास्थेमुळे भाविक आध्यात्मिक ज्ञानापासून वंचित
मंदिर व्यवस्थापनामध्ये निष्काम भक्तांऐवजी परिसरातील राजकारणी किंवा सधन व्यक्ती यांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे काही मंदिरांचे विश्वस्त आणि कर्मचारी यांना त्या मंदिरातील देवतेविषयीच श्रद्धा नसते. अनेकांना तर ती देवता किंवा संत यांच्याविषयी नीट माहितीही नसते. ते देवता किंवा संत यांच्याविषयी लिहिलेल्या ग्रंथसंपदेविषयी अनभिज्ञ असतात. सर्व संतांनी वेदांमधील तत्त्वज्ञान अभंग किंवा ओवी यांच्या माध्यमातून सोप्या आणि सुलभ भाषेत सांगितले आहे. त्यामुळे या मंदिरांमधून त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार-प्रसार होणे अपेक्षित असते; पण तसे होत नाही. त्यामुळे हिंदूंना त्यांच्या देवीदेवता आणि संत यांच्या टिकेचा प्रतिवाद करता येत नाही.
६. हिंदूंनी उपासना वाढवणे आवश्यक !
उपासनेच्या अभावी हिंदू भक्ती आणि शक्ती यांमध्ये अल्प पडू लागले आहेत. आपल्या घरांमध्ये सायंकाळच्या वेळी ‘शुभम् करोती’ कानी पडण्याऐवजी मालिकांमधील संभाषणे कानावर पडतात. आपल्या घरी लक्ष्मी येण्याच्या वेळी मालिकांमधील कटकारस्थाने, दोन बायकांच्या भानगडी, फसवणूक इत्यादी गोष्टी मोठ्या आवाजात कानावर पडतात. त्यामुळे ‘साहजिकच काकू, मावशी, आत्या या कारस्थानीच असतात’, हा अपसमज मनात घर करू लागतो. यासमवेतच हिंदु देवतांची सर्वाधिक विटंबना दूरचित्रवाहिन्यांवरील अशा कार्यक्रमांमधूनच केली जाते.
७. उपासना करून ईश्वराचे भक्त बना !
ज्या व्यक्ती आज अधर्माने वागत आहेत, त्यांची पुढची अवस्था कशी असेल आणि भगवंत त्यांना कशी शिक्षा देईल ? यावर मनुस्मृतीमध्ये फार सुंदर श्लोक दिला आहे.
अधर्मेणैधते तावत् ततो भद्राणि पश्यति ।
तत: सपत्नाञ्जयति समूलस्तु विनश्यति ॥
– मनुस्मृति, अध्याय ४, श्लोक १७४
अर्थ : अधर्म केल्यावर लगेच त्याचे दुष्परिणाम दिसत नसल्याने काही काळापर्यंत अधार्मिकाची भरभराट झालेली दिसते. त्याला सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा प्राप्त होते. तो आपल्या शत्रूवरही मात करू शकतो; पण शेवटी अधार्मिकाचा नाश होतोच.
तेव्हा आपल्या मंदिरांचा उत्कर्ष होण्यासाठी आपल्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. हिंदूंनी मंदिरात भक्त म्हणून जाणे आवश्यक आहे, पर्यटक म्हणून नाही. आजपर्यंत भक्तासाठी भगवंत धावून आल्याची सहस्रो उदाहरणे आहेत; पण पर्यटकासाठी भगवंत धावून आल्याचे एकही उदाहरण नाही.’
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग.
‘आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करणारे खरोखरच विचारप्रवर्तक, असे हे दैनिक आहे.’ – सौ. सत्यवती पांडुरंग लिंगुडकर (निवृत्त शिक्षिका), आराडी, गिरी, बार्देश, गोवा. (८.४.२०२३) |