ब्रेक्झिटनंतर पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणार्‍या गोमंतकियांमध्ये घट

(ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटन युरोपियन महासंघातून बाहेर पडणे)

ब्रेक्झिटनंतर पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणार्‍या गोमंतकियांमध्ये घट

पणजी, २१ एप्रिल (वार्ता.) – गोव्यातील नागरिक आणि विशेषतः ख्रिस्ती पोर्तुगीज पारपत्राद्वारे पोर्तुगालमध्ये जाऊन तेथील नागरिकत्व स्वीकारत असत आणि त्यानंतर पोर्तुगाल आणि इंग्लंड दोन्ही युरोपियन महासंघात असल्याने त्यांना इंग्लंडमध्ये पारपत्राविना जाऊन रहाणे शक्य होत असे. वर्ष २०२० मध्ये युरोपियन संघातून इंग्लंड बाहेर पडला (ब्रेक्झिट) आणि त्यानंतर पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणार्‍या गोमंतकियांमध्ये ६० टक्क्यांनी घट झाली आहे.

वर्ष २०२२ मध्ये प्रतिदिन सरासरी ४ हून अल्प गोमंतकियांनी पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारले, तर ही संख्या वर्ष २०१५ ते २०१९ पर्यंत प्रतिदिन सरासरी १० होती. पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारल्याने युरोपियन महासंघांतील देशांमध्ये जाता येणे किंवा यामुळे जगातील १५० देशांमध्ये जाता येणे, रोजगार, गलेलठ्ठ वेतनाची नोकरी मिळवणे आदी कारणांमुळे गोमंतकीय नागरिक पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्यास इच्छुक होते. सध्या ब्रेक्झिटमुळे इंग्लंडमध्ये स्थायिक होऊ इच्छिणार्‍यांना पूर्वीप्रमाणे तेथील सरकारच्या स्थलांतरितांसाठी असलेल्या सुविधा आता उपलब्ध नाहीत आणि यामुळे पोर्तुगीज पारपत्र घेऊ इच्छिणार्‍यांची संख्या घटत आहे.

गोवा विभागीय पारपत्र कार्यालयातील नोंदणीनुसार भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेली वर्षनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –

वर्ष २०१५ मध्ये ३ सहस्र ८७३, वर्ष २०१६ मध्ये ४ सहस्र १३९, वर्ष २०१७ मध्ये ३ सहस्र ६३४, वर्ष २०१८ मध्ये ३ सहस्र ६०३, वर्ष २०१९ मध्ये २ सहस्र ९२७, वर्ष २०२० मध्ये ९३० (कोरोना महामारीमुळे अल्प), वर्ष २०२१ मध्ये २ सहस्र ८३५ आणि वर्ष २०२२ मध्ये १ सहस्र २६५.