६ जणांवर गुन्हा नोंद !
संगमनेर (जिल्हा नगर) – येथील मोगलपुर्यातील अवैध पशूवधगृहावर पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या विशेष पथकाने धाड टाकली. त्या धाडीत ३ लाख ४० सहस्र रुपये मूल्यांचे १ सहस्र ७०० किलो गोवंशियांच्या मांसासह २ वाहने असा एकूण ९ लाख ६० सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस आल्याचे पहाताच पशूवधगृहाचा चालक सोनू रफीक कुरेशी, सालीम कुरेशी, तसेच वाहनचालक असे एकूण ४ जण अंधाराचा अपलाभ घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून ६ जणांवर गुन्हा नोंद केला आहे, तसेच आसिफ कुरेशीसह अल्पवयीन मुलाला कह्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलाला नगरच्या बाल न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे.
पशूवधगृहामध्ये एका बंद पत्र्याच्या खोलीत मोठ्या प्रमाणात गोवंशियांची कत्तल करून काही व्यक्ती गोमांस वाहून नेत होत्या आणि पलीकडील बाजूला उभ्या करण्यात आलेल्या वाहनांत भरत होत्या. हे पोलिसांना आढळून आल्यावर त्यांनी वरील कारवाई केली. (स्वातंत्र्यपूर्वकाळात ९० कोटी संख्येने असलेला गोवंश राजरोसपणे होत असलेल्या गोहत्येमुळे सध्या १ कोटीवर आला आहे. याचा एकंदरित परिणाम आज भारतातून गोवंश याच पिढीच्या डोळ्यांदेखत नष्ट होत आहे ! गोवंश हत्याबंदी कायदा केवळ कागदावरच राहिला आहे कि काय ? अशी शंका या घटना पहाता मनात येते ! – संपादक)