चापेकर बंधूंच्या बलीदानानंतर त्यांच्या कुटुंबियांना तत्कालीन समाज आणि सरकार यांच्याकडून मिळालेली वागणूक

१८ एप्रिल २०२३ या दिवशी क्रांतीकारक दामोदर चापेकर बलीदानदिन झाला. त्या निमित्ताने…

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात खरोखरचे कर्तव्य केलेल्यांना समाज त्याची पोचपावती देत नाही आणि दिलीच तर त्या समाजाच्या सोयीनुसार देतो, हे मी अनेकदा बघितले आहे आणि आजही बघतो आहे. याविषयी तसे बोलून दाखवले की, त्यावर बर्‍याचदा ‘अहो, त्यांनी (क्रांतीकारकांनी) कोणत्या अपेक्षेने कार्य केले नाही. त्यामुळे त्यांना श्रेय दिले नाही, तर त्यांचे काही बिघडत नाही’, असे उत्तर मिळते. हे उत्तर देणार्‍यांपेक्षा या कर्तृत्ववान लोकांना सरळ तोंडावर शिव्या घालणारे लोक परवडतात. त्यामुळे असे उत्तर देणार्‍यांनी पुढील भाग आवर्जून वाचावा.

१. चापेकर बंधूंना फासावर दिल्यावर काही दिवसांतच त्यांच्या वाड्याला आग लागली, ज्यात त्यांची बरीच संपत्ती आणि कागदपत्रे जळून गेली.

२. चापेकर बंधूंपैकी एकाच्या पत्नीने जी अगदीच लहान होती, तिने नवर्‍याच्या निधनानंतर तत्कालीन रूढीनुसार केशवपन (डोक्यावरील पूर्ण केस काढणे) केले. तिला कुणीच फारसे आपले मानले नाही. पांढर्‍या पायाची (अपशकुनी) म्हणून तिचा छळ झाला. त्यांचे नाव दुर्गाबाई चापेकर !

३. चापेकर कुटुंबाला तत्कालीन समाजाने बर्‍यापैकी वाळीत टाकले होते.

४. चापेकर बंधूंपैकी एकाची पत्नी स्वातंत्र्यानंतर काही वर्षे जिवंत होती. एरव्ही हातभट्टी असणार्‍या लोकांनाही निवृत्तीवेतन देणार्‍या भारत सरकारने शेवटपर्यंत चापेकरबाईंना मात्र ते दिलेच नाही. भूमी, सरकारी पद, दुकान वगैरे गोष्टी तर चापेकरांना मिळणे दूरच !

५. चापेकर यांचा एक वंशज पुढे बर्‍याच वर्षांनी इंग्लंडमध्ये कायदा शिकायला गेला. इंग्रज सरकारने त्याच्या मागे पूर्णकाळ गुप्तहेर नेमला होता आणि त्याची अन् त्याला आलेली सर्व पत्रे इंग्रज सरकार गुपचूप फाडून वाचत असे (परिनिरीक्षण केल्याप्रमाणे) अन् मगच त्याला ती मिळत (ती पत्रे ३२ वर्षांनंतर देण्यात आली).

६. या क्रांतीकारकांपैकी एकाच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर  त्यांना स्मशानात पोचवण्यासाठीही लोक जमले नव्हते.

७. ‘‘आमचे पूर्वज फासावर गेल्यानंतर येथील समाज त्यांच्या वंशजांशी जे वागला ते बघून आता आमच्यापैकी कुणीही राजकारणात फारसा रस घेत नाही. त्यापासून दूर रहातो’’, असे चापेकर यांचे वंशज सांगतात.

बर्‍याच क्रांतीकारकांच्या वंशजांमध्ये मला वरील प्रकारचा राग आणि चीड त्यांच्याशी बोलतांना दिसली आहे. महाराष्ट्र चापेकर बंधूंना ‘ब्राह्मण’ या त्यांच्या जातीमुळे शिव्या घालत असला, तरी तिकडे दूर पंजाबातील लोक त्यांचे कौतुक करत आणि त्यांना मानत होते.

– डॉ. सुबोध नाईक (साभार : फेसबुक)