‘यू ट्यूब’वरील खोट्या बातम्या (फेक व्हिडिओज) काढून टाका ! – दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश

अमिताभ बच्चन यांची नात आराध्या हिच्याविषयी खोटा व्हिडिओ प्रसारित केल्याचे प्रकरण

नवी देहली – यू ट्यूबचे हे दायित्व आहे की, त्याने खोट्या बातम्यांवर बंदी आणावी. तुमच्याकडे अशा प्रकारच्या बातम्यांना आळा घालण्यासाठी निश्‍चित धोरण का नाही ? तुम्ही जर एखाद्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत असाल, तर त्यावर प्रसारित होणार्‍या आशयाच्या संदर्भात तुमचे काहीच दायित्व नाही का ? याचा अर्थ तुम्ही केवळ लोकांना चुकीची माहिती पसरवण्यासाठी सोय उपलब्ध करून देत आहात, असे खडेबोल दिल्ली उच्च न्यायालयाने यू ट्यूबला सुनावले.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन हिने तिच्या प्रकृतीविषयी यू ट्यूबवर प्रसारित झालेला एक व्हिडिओ खोटा असल्याचे सांगत त्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने यू ट्यूब तसेच गूगलचीही कानउघाडणी केली.

संपादकीय भूमिका

  • ‘यू ट्यूब’सारख्या अमेरिकी आस्थापनांची सामाजिक बांधिलकी नसल्याची घटना पुन्हा एकदा समोर ! यू ट्यूब न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करील का, हे सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने पहाणे आवश्यक !