गोव्यातील वन क्षेत्राला लागलेल्या आगींमुळे पावसात पूर येण्याची शक्यता ! – तज्ञांचे मत

पणजी, १९ एप्रिल (वार्ता.) – गोव्यात हल्लीच वन क्षेत्रांत लागलेल्या आगीमुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेवर विपरीत परिणाम झाला आहे. या आगीमुळे जलविज्ञान चक्रावर (‘हायड्रोलॉजिकल सायकल’वर) परिणाम झाला आहे. यामुळे पुढे पावसाळ्यामध्ये पूर येणे, धातू (मेटालिक) प्रदूषण होणे आणि अन्य स्थितींवर देखरेख ठेवावी लागणार आहे, असे मत पर्यावरण तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे ज्येष्ठ प्रधान वैज्ञानिक (निवृत्त) अरविंद सरण

पर्यावरण तज्ञांच्या मते वनक्षेत्रांना लागलेल्या आगीचा परिणाम थेट दिसू शकत नाही, तरी पावसात पाणी वाहून जातांना मातीचा भराव आणि राख वाहून नाले आणि नदी यांमध्ये जाण्याची शक्यता आहे. दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे ज्येष्ठ प्रधान वैज्ञानिक (निवृत्त) अरविंद सरण म्हणाले, ‘‘वन क्षेत्रांतील आगींमुळे म्हादई अभियारण्यातील पाण्याचे संरक्षण, पाण्याचा दर्जा आदींवर परिणाम झाला आहे. पावसाळ्यात वनांमधून जळलेल्या झाडांचे अवशेष आणि राख नद्यांमध्ये वाहून येणार आहे आणि यावर अभ्यास झाला पाहिजे. आग लागण्यापूर्वी आणि आग लागल्यानंतर या दोन्ही स्तरांवर ‘मेटल्स’, ‘न्यूट्रीयंट्स’ आणि ‘सॉईल सेडीमेंट्स’ यांच्या मात्रांसंबंधी अभ्यास केला पाहिजे.’’ नद्यांमध्ये अगोदरच गाळ साचलेला आहे. सह्याद्रीच्या डोंगरांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तेथून मातीचा भराव नद्यांमध्ये आल्यास समस्येत वाढ होणार आहे. याचा अधिक परिणाम सांखळी, डिचोली आदी भागांत दिसून येईल. सांखळी येथील वाळवंटी नदी पावसात काही दिवसांत तुडुंब भरून वहात असते. ‘हायड्रोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थेने २ दशकांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणामध्ये मांडवी नदीतही मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याचे लक्षात आले होते.