सोलापूर येथे ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने निवेदन सादर
सोलापूर, १८ एप्रिल (वार्ता.) – येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, चिखल आणि बसस्थानकावर उघड्यावर करण्यात येत असलेले मूत्रविसर्जन यांमुळे बसस्थानकावर अत्यंत अस्वच्छता असून दुर्गंधी पसरली आहे. पिण्याच्या पाण्याचे नळ तुटले आहेत. नळावर पाणी पिण्यासाठी पेल्याची व्यवस्था नाही. पाणी पिणार्यास किळस वाटेल, अशी नळाखाली घाण साचली आहे, या आणि अशा अनेक समस्या दूर करून स्थानकाची स्वच्छता करण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने राज्य परिवहन महामंडळाचे सोलापूर विभागीय वाहतून अधीक्षक सदाशिव कदम यांना देण्यात आले. या प्रसंगी जी.एस्.टी. सल्लागार श्री. गणेश वास्ते, उद्योगपती श्री. किशोर पुकाळे, श्री. निखिल बोगा, सुराज्य अभियानाचे श्री. दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते. श्री. सदाशिव कदम यांनी ‘निवेदनात दिल्याप्रमाणे सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू’, असे सांगितले.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या…
१. बसस्थानकावर आवश्यक ठिकाणी कचराकुंडी ठेवण्यात यावी, तसेच सूचनाफलक लावण्यात यावेत.
२. सोलापूर येथील उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याचे नळ त्वरित चालू करावेत.
३. बसस्थानकाच्या आवारात जागोजागी गुटखा, पानमसाला खाऊन थुंकल्याचे डाग आहेत. याविषयी नागरिकांचे प्रबोधन करून प्रसंगी दंडात्मक कारवाई करावी.
४. स्थानकातील बाकडे तुटलेले असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागते. याची गांभीर्याने नोंद घेऊन पुरेशी आसनव्यवस्था करण्यात यावी.