वैद्यकीय पर्यटनात भारत आघाडीवर ! – केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक

‘जी-२०’ आरोग्य क्षेत्र कार्यगटाच्या बैठकीला गोव्यात प्रारंभ

‘जी-२०’ बैठकीला फीत कापून प्रारंभ करतांना केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार आणि अन्य मान्यवर

पणजी, १७ एप्रिल (वार्ता.) – मागील एका वर्षात १४ लाख वैद्यकीय पर्यटकांनी भारताला भेट दिली आहे. वैद्यकीय पर्यटनात भारत आघाडीवर आहे. आज जागतिक आरोग्यासाठी अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत दृष्टीकोन यांची आवश्यकता आहे. यासाठी एकत्रितपणे योगदान देणे, तसेच जागतिक आरोग्य व्यवस्थेच्या विविध पैलूंवर अर्थपूर्ण चर्चा करणे आवश्यक आहे, असे आवाहन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी येथे केले. भारताच्या ‘जी-२०’ अध्यक्षतेखालील आरोग्य क्षेत्र कार्यगटाच्या दुसर्‍या बैठकीला १७ एप्रिलपासून गोव्यात ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये प्रारंभ झाला. १७ ते १९ एप्रिल या कालावधीत ही बैठक होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी बीजभाषण केले, तर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या बैठकीत विशेष मार्गदर्शन केले. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल(आरोग्य), केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, त्याचप्रमाणे ‘जी-२०’ सदस्य देश, विशेष निमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संघटना, मंच यांचे प्रतिनिधी आणि भागीदार या बैठकीला उपस्थित होते.

‘जी-२०’ बैठकीला उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर

या वेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, ‘‘महामारीचा धोका अल्प करण्यासाठी ‘एक आरोग्य’ हा दृष्टीकोन ठेवून आरोग्य व्यवस्थेमधील गुंतवणुकीत वाढ होणे अपेक्षित आहे. लवचिक आणि बळकट जागतिक आरोग्य व्यवस्था सिद्ध झाली पाहिजे. यासाठी ‘जी-७’, जागतिक बँक, महामारी निधी आदी विविध बहुस्तरीय मंचांतर्गत विविध आरोग्य उपक्रमांना जोडण्यासाठी ‘जी-२०’ सदस्य राष्ट्रांनी काम करण्याची आवश्यकता आहे.’’

बैठकीत आरोग्याच्या प्राधान्यक्रमांना अधोरेखित केल्याबद्दल इंडोनेशिया आणि ब्राझिल ट्रोइका सदस्यांनी भारतीय अध्यक्षतेची प्रशंसा केली. औषध उत्पादन विभागाच्या सचिव एस्. अपर्णा, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे) महासंचालक डॉ. राजीव बहल, तसेच आरोग्य अन् कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल, केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि जी-२० सदस्य देशांचे अन्य प्रतिनिधी, विशेष निमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संस्था, मंच यांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते.

‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही भारताच्या ‘जी-२०’ अध्यक्षतेची संकल्पना ! – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, ‘‘भारताचे ‘जी-२०’ प्राधान्यक्रम उत्तरदायी, समावेशक, समानताकारक आणि प्रतिनिधित्व देणार्‍या मंचाची निर्मिती करणे आहे. यामुळे २१ व्या शतकातील अनेक आव्हानांवर तोडगा काढण्यात येणार आहे. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही भारताच्या ‘जी-२०’ अध्यक्षतेची संकल्पना आहे. सध्या जागतिक आरोग्य क्षेत्रात विचारमंथन चालू आहे. यामुळे या क्षेत्राला जी चालना मिळाली आहे, त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे, तसेच सहकार्यकारक देखरेख, समुदायाचे रक्षण, वैद्यकीय उपाययोजना आणि तातडीचा समन्वय यांवर सर्वांनी भर दिला पाहिजे. जागतिक वैद्यकीय प्रतिबंधात्मक समन्वय मंचाव्यतिरिक्त भावी आरोग्यविषयक तातडीचा व्यवस्थापन, संशोधन आणि विकासाचे जाळे, तसेच लसी अन् औषधे यांचे उत्पादन यांवर सहमती निर्माण करण्याची आवश्यकता आहे.’’