महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘सावरकर गौरव यात्रा’ आयोजित करण्यात आली. या आधीच्या कोणत्याही सरकारने अशी गौरव यात्रा आयोजित केली नाही. ‘हर घर सावरकर’ (प्रत्येक घरी सावरकर), अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर गतकाळातील स्मृती जागी झाली. या निमित्ताने ती सांगण्याचा मोह आवरता आला नाही.
१. ब्रिटीश संसद भवनाच्या एका सभागृहात सावरकर जन्मशताब्दीची झालेली सभा आणि मान्यवरांनी काढलेले गाैरवोद्गार !
सावरकरप्रेमी मुकुंद सोनपाटकी यांनी लंडनमध्ये ‘सावरकर जन्मशताब्दी समिती’ स्थापून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या त्यागी आणि पराक्रमी जीवनाची माहिती प्रसारित केली. त्यामुळे लंडनमधील लॉर्ड फ्रेनर ब्रॉक्वे हे ९७ वर्षांचे पुढारी प्रभावित झाले. तेथील ‘मजूर पक्षा’चे एम्.पी. रेजफ्रिसन आणि रिचर्ड बाल्फ यांनी सावरकर जन्मशताब्दी समितीचे नेतृत्व स्वीकारले. ६ जून १९८४ या दिवशी पार्लमेंट हाऊसच्या (संसद भवनाच्या) एका सभागृहात सावरकर जन्मशताब्दीची सभा भरली. या सभेला २०० इंग्रज आणि भारतीय स्त्री-पुरुष उपस्थित होते.
या सभेचे संचालन करतांना रेजफ्रिसन म्हणाले, ‘‘पार्लमेंट हाऊसमध्ये ही सभा भरवण्यास आम्ही तुम्हाला अनुमती दिली नसून आमंत्रण दिले आहे.’’ त्या वेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. फ्रेनर ब्रॉक्वे त्यांच्या संदेशात म्हणाले, ‘‘५० वर्षांची शिक्षा झाल्यावर इंग्रजांचे राज्य तरी इथे ५० वर्षे रहाणार आहे काय ?’’ या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उद्गाराचा उल्लेख करून त्यांच्या ब्रिटीश साम्राज्यशाही विरुद्धच्या लढ्याचा आणि सामाजिक समानतेसाठीच्या लढ्याचा गौरव केला. रिचर्ड बाल्फ म्हणाले, ‘‘सावरकर २७ वर्षे कारागृहात नसते, तर भारतीय राजकारणाला निराळीच दिशा मिळाली असती.’’
सावरकर यांचे इंग्रजी चरित्रकार विद्यासागर आनंद यांनी सावरकरांचे रोमहर्षक चरित्र सांगितले. दैनिक ‘केसरी’चे पेंडसे आणि जन्मशताब्दी समितीचे कोषाध्यक्ष भास्कर गद्रे यांनी सावरकर यांच्या आठवणी सांगितल्या. ज्या साम्राज्य सत्तेविरुद्ध सावरकरांनी बंड पुकारले तिच्याच सर्वोच्च सत्तेचे प्रतीक अशा ब्रिटीश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये देशभक्त सावरकर यांची जन्मशताब्दी साजरी झाली. हा सावरकर यांच्या स्मृतीचा सर्वोच्च गौरव होता.
२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घरावर स्मृतीशीला बसवली जाणे आणि त्याविषयी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी काढलेले गौरवोद्गार !
या घटनेनंतर फ्रेनर ब्रॉक्वे या ८४ वर्षांच्या नेत्याने ‘इंडिया हाऊस’च्या ‘६५ क्रोमवेल व्हेन्यू’मधील घरावर सावरकर यांची स्मृतीशीला बसवण्यासाठी कौन्सिलने अनुमती दिली. त्यानुसार ८ जून १९८५ या दिवशी सावरकर यांच्या त्या स्मृतीशीलेचे अनावरण फ्रेनर ब्रॉक्वे यांनी केले. या समारंभाला हिंदुस्थानचे क्रिकेटमधील विक्रमवीर सुनील गावस्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या वेळी गावस्कर यांनी केलेल्या छोट्या भाषणात स्वतःचे मनोगत व्यक्त करतांना म्हटले, ‘‘आम्ही स्वतंत्र हिंदुस्थानात जन्माला आलो; पण ही स्मृतीशीला ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतीकारक यांची आम्हाला आठवण करून देत राहील.’’
फ्रेनर ब्रॉक्वे यांनी सुनील गावस्कर यांना शाबासकी दिली आणि सावरकर यांच्या देशभक्तीचा गौरव स्वतःच्या छोट्याशा भाषणात केला. तसेच या समारंभात त्यांना ‘उपस्थित रहाता आले, याचा अभिमान वाटतो’, असे उद्गारही त्यांनी काढले.
या वर्तुळाकार स्मृतीशीलेवर खालील अक्षरे कोरलेली आहेत.
Greater London Council
Vinayak Damodar Savarkar
1883-1966
Indian Patriot and Philosopher Lived Here
३. सावरकर यांची भक्ती इंग्रजांना कळणे; पण स्वकियांना न कळणे, हे दुर्दैव !
इंग्रजांसारख्या शत्रूला सावरकर यांची राष्ट्रभक्ती कळली, सावरकर यांचे श्रेष्ठत्व कळले; पण दुर्दैवाने आपल्या देशातील स्वकीयांना ते कळले नाही. सावरकरांविषयी शत्रूपेक्षाही अधिक द्वेषभाव देशातील स्वकीयांच्या मनात आणि बुद्धीत आहे. दैव दुर्विलास आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (६.४.२०२३)