युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी ‘बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूंचे प्रेरणास्थान कसे ?’, असे वक्तव्य केल्याचे प्रकरण
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची वेळ आपल्याच देशात यावी, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. संपूर्ण जगात राष्ट्रभक्त, राजकीय तत्त्ववेत्ता, तेजस्वी बुद्धीमान, चारित्र्यसंपन्न महाकवी, मानवतेचा उपासक, जातीभेद नष्ट करण्यासाठी जिवाचे रान करणारा समाजसुधारक, राष्ट्रहितासाठी अप्रियता स्वीकारण्यास तत्पर असलेला क्रांतीकारक म्हणून मान्यता पावलेले सावरकर आहेत. सावरकर यांचे हे श्रेष्ठत्व स्वीकारण्यासाठी आणि मान्य करण्यासाठी तशी बुद्धी असावी लागते. दुर्दैवाने तशी बुद्धी असलेल्या लोकांची संख्या आपल्या देशात अल्प आहे कि काय ? अशी शंका यावी, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.
१. सावरकर यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे, हेच बुद्धीहीनांचे काम !
आज-काल कुणीही उठतो आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर गलिच्छ आरोप करून मोकळा होतो. आरोप करणार्यांची बौद्धिक कुवत किती निम्नस्तरावरची आहे, ते त्यांनी केलेल्या आरोपावरूनच सिद्ध होते. आरोप करणार्यांनी सावरकर वाङ्मयाचा अभ्यास केलेला नाही. तसेच सावरकर यांची राजनीती अभ्यासलेली नाही, हे ठामपणे सांगता येते. सावरकरांवर बेछूट आरोप करायचे; पण ते आरोप करतांना आवश्यक असलेले संदर्भ मात्र दिले जात नाहीत. सावरकर यांचे विचार, त्यांचे तत्त्वज्ञान बौद्धिक पातळीवर खोडून काढता येत नाहीत. त्यामुळे आरोप करणार्यांना एकच मार्ग उरतो, तो म्हणजे सावरकर यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे. तेच काम हे बुद्धीहीन लोक सध्या करत आहेत आणि त्यांची संख्या वेगाने वाढत आहे.
२. सावरकर यांच्यावर आरोप करणार्यांना इस्लामी आक्रमक प्रिय !
सावरकर यांच्यावर आरोप करणार्यांना मात्र आतंकवाद्यांविषयी नितांत प्रेम आहे. इस्लामी आक्रमक त्यांच्या दृष्टीने राष्ट्रपुरुष आहेत, ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारे त्यांच्या लेखी राष्ट्रभक्त आहेत, ‘देशात बाँबस्फोटांच्या मालिकांच्या मागून मालिका घडवून आणणारे ‘अहिंसावादी’ आणि ‘शांतीदूत’ आहेत’, असे त्यांचे प्रामाणिक मत आहे. हिंदूंच्या स्त्रिया पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करणारे नराधम त्यांना प्रातःस्मरणीय वाटतात; म्हणूनच ते सावरकर यांच्यासारख्या द्रष्ट्या पुरुषाला सातत्याने आरोपीच्या पिंजर्यातून बाहेर येऊ देत नाहीत.
३. सावरकर यांच्याविषयी इंग्रजांना विश्वास वाटणे; पण भारतात त्यांच्याविषयी जावईशोध लावले जाणे
इंग्रज सत्ताकाळातील तत्कालीन गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांच्या विनंतीनुसार गृहमंत्री मॉरिस हेवर्ड हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भेटण्यासाठी येरवड्याच्या कारागृहात गेले होते. सावरकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मॉरिस हेवर्ड यांनी त्यांचे मत सरकारला कळवतांना म्हटले, ‘‘गुन्हेगार जमातीची सुधारणा करण्याच्या कामासाठी सावरकर यांची नियुक्ती करण्यास हरकत नाही.’’ (संदर्भ – ‘क्रांतीकल्लोळ’ पुस्तक, प्रकरण १३, पृष्ठ ५४२, लेखक – वि.श्री. जोशी)
‘सावरकर यांच्या सहवासात गुन्हेगार जमात आली, तर ती सुधारू शकते’, असा विश्वास ब्रिटीश सरकारला होता. तरीसुद्धा ‘सावरकर ‘बलात्कार हे राजकीय हत्यार’, असा विचार व्यक्त करत होते’, असा जावईशोध लावला जातो.
४. सावरकर यांच्याविषयी आरोप करणे हे विकृत बुद्धीचे वर्तन !
सावरकर यांच्या चारित्र्याविषयी शत्रू जराही शंका घेत नाही. हे गृहमंत्री मॉरिस हेवर्ड यांच्या वर उल्लेखिलेल्या विधानावरून स्पष्ट होते; पण हिंदु स्त्रियांवर अत्याचार करणारे इस्लामी परकीय आक्रमक आणि काश्मीरमधील हिंदु स्त्रियांवर बलात्कार करणारे नराधम यांच्या विरुद्ध त्यांच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही. त्यांचे हे वर्तनच त्यांची विकृत बुद्धी उघड करते; म्हणूनच ‘आपल्या देशात बुद्धीहीनांच्या संख्येत वाढ होत आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१६.४.२०२३)