लोलये (गोवा) येथील नाल्यातील पाणी जाण्याच्या पाईपमधील गाळ साचल्याची तक्रार ‘ट्विटर’द्वारे नोंदवल्यानंतर कोकण रेल्वेकडून गाळ स्वच्छ !

सध्याच्या काळात ट्विटरचा प्रभावी वापर करून स्थानिक समस्या कशा प्रकारे सोडवू शकतो ? याचे उदाहरण !

लोलये (काणकोण, गोवा) – लोलये येथून गेलेल्या कोकण रेल्वेच्या पुलाखाली नाल्याचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईप घालण्यात आले आहेत. त्या पाईपची कोकण रेल्वेकडून अनेक वर्षे स्वच्छता न झाल्यामुळे त्यात गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात नाल्याचे पाणी या पाईपमधून न जाता ते परिसरातील श्री. विभव उपाख्य गिरिजय परशुराम प्रभुदेसाई यांच्या बागायतीत घुसून झाडांची हानी होत असे. ही समस्या बागायतीचे मालक श्री. प्रभुदेसाई यांनी ट्विटरद्वारे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्या पाईपमधील गाळ काढण्याचे काम चालू केले आहे.

 २ मासांच्या पाठपुराव्याला यश !

श्री. प्रभुदेसाई यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी कोकण रेल्वेच्या @KonkanRailway या ट्विटरवरील खात्याला ‘टॅग’ करून हा गाळ स्वच्छ करण्याची विनंती केली होती. त्यानंतरही समस्या न सुटल्यामुळे त्यांनी ६ एप्रिल या दिवशी @WesternRly, रेल्वे मंत्रालयाचे ट्विटर खाते @RailMinIndia, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे ट्विटर खाते @AshwiniVaishnaw यांना टॅग करून त्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे ७ एप्रिल या दिवशी रेल्वे अधिकारी श्री. अभय धुरी यांनी येऊन नाल्यातील गाळ स्वच्छ करण्याचे काम चालू केले !

यासंदर्भात श्री. अभय धुरी आणि कोकण रेल्वे प्रशासन यांचे श्री. प्रभुदेसाई यांनी ट्विटरद्वारे आभार मानले आहेत.

रेल्वेस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवा !

आपापल्या भागांतील रेल्वेस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती रेल्वे खात्याच्या ‘@RailMinIndia’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावरही पाठवा. रेल्वेस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी रेल्वे खात्याला सहकार्य करा.