पुणे येथील प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांनी ‘संगीताच्या माध्यमातून साधने’विषयी केलेले अनमोल मार्गदर्शन आणि त्यांचे संगीत-साधनेतील काही अनुभव !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी अभ्यासाच्या दृष्टीने मुंबई आणि पुणे येथील संगीत क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या भेटी घेतल्या. त्यांनी १६.९.२०१९ या दिवशी पुणे येथे वास्तव्यास असलेले प्रसिद्ध तबलावादक, तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी पं. सुरेश तळवलकर यांचा संगीताकडे साधना म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन लक्षात आला. पं. सुरेश तळवलकर यांचे संगीत-साधनेविषयीचे विचार पुढे दिले आहेत.

डावीकडून सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, पं. सुरेश तळवलकर आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. विनय कुमार

१. कलाकाराची संगीतातून साधना होण्यासाठी त्याच्या जीवनात संगीतातील गुरूंसह त्याला आध्यात्मिक गुरुही असणे आवश्यक आहे ! 

पं. सुरेश तळवलकर यांना संगीतातील गुरु आणि अध्यात्मातील गुरु यांविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘संगीतातील गुरु हे अध्यात्मातील गुरु असण्याची शक्यता अल्प असते. संगीत-साधना करून आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची असेल, तर पाठीशी आध्यात्मिक गुरुच हवा. माझी तर श्रद्धा आहे की, अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसारच संगीतातून साधना होऊ शकते. सध्याच्या काळात असलेले संगीतातील गुरु हे आध्यात्मिक अधिकारी नाहीत.’’ पुढे त्यांनी नम्रपणे सांगितले, ‘‘मीही त्यांतीलच एक आहे.’’

२. संगीत-साधनेचा भावार्थ

अ. संगीत रियाज (सराव) + साधकाचा आत्मिक भाव + सात्त्विक भाव = संगीत-साधना

आ. संगीत रियाज (सराव) – (उणे) अहंकार = संगीत-साधना

३. ‘संगीतातून साधना करतांना स्वतःतील अहंचे निर्मूलन करणे आवश्यक आहे’, याविषयी पं. तळवलकर यांनी स्वतःच्या उदाहरणातून सांगणे

पं. सुरेश तळवलकर यांनी सांगितले, ‘‘एकदा मी श्री. बाबा बेलसरे (पू. के. व्ही. बेलसरे) यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.

श्री. बाबा बेलसरे : तुमचे तबलावादन कसे चालू आहे ?

मी (पं. तळवलकर) : मी एक प्रश्न विचारू का ?

श्री. बाबा बेलसरे : विचारा.

मी : मी प्रतिदिन तबलावादनाचा रियाज (सराव) करतो. मी १०८ वेळा तबल्याची आवर्तने (टीप) करतो. आता मला जाणवत आहे, ‘या साधनेची काहीतरी शक्ती आता माझ्याभोवती कार्यरत होत आहे. त्यामुळे मी तबल्यातील एखादा बोल अचूक आणि सरस वाजवतो.’ मला हे जमू लागल्यावर ‘मला जमले’, असे वाटून माझ्यातील अहं वाढत आहे’, असे मला वाटते. त्यावर कसे करावे ?

टीप – आवर्तन : तालाच्या पहिल्या मात्रेपासून क्रमशः पुन्हा पहिल्या मात्रेवर येण्याच्या क्रियेस ‘आवर्तन’, असे म्हणतात.

श्री. बाबा बेलसरे : ‘हे तुमच्या लक्षात येत आहे’, ते चांगले आहे. तुम्ही यावर काही मार्ग काढला का ?

मी : मी विविध प्रकारे विचार करून ‘माझ्यात इतरांपेक्षा न्यूनता कशी आहे आणि मला अजूनही पुष्कळ शिकायचे आहे’, हा भाग मनावर सतत बिंबवतो.

श्री. बाबा बेलसरे : आता तुम्ही खरे अध्यात्ममार्गावर आहात. ‘भगवंतच कर्ता-करविता आहे’, हे सतत ध्यानात ठेवावे.

४. साधना सतत करायची असते !

‘संगीताचा रियाज (सराव) २ घंटे केला की, साधना झाली’, असे होत नाही. आपण साधना करतांना ध्येय ठरवतो की, अमुक एक करायचे. ते साध्य झाल्यानंतर मग त्या साध्याला साधन बनवून आपण पुन्हा दुसरे ध्येय ठरवतो. संगीत-साधना सतत करावी लागते.

५. तुमच्या गुरूंनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया योग्य आहे अन् ही प्रक्रिया केल्यानेच साधनेत काहीतरी मिळवणे शक्य आहे ! 

 मी पं. तळवलकर यांना सांगितले, ‘‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून कलाकाराचा संगीत-साधनेचा पाया रचला जातो. कलाकाराकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवली जाते.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘व्यक्तीने स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. हे केवळ लोकांना दाखवण्यासाठी नको. ते आतून व्हायला हवे. तुमच्या गुरूंनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया सांगितली, ती योग्यच आहे. मीही त्याच मार्गाचे अनुकरण करत आहे. ही प्रक्रिया नीट झाली, तरच साधनेत काही हाताला लागण्याची शक्यता आहे.’’

६. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांच्या कार्यक्रमाच्या वेळी पं. तळवलकर यांना तबलावादन करण्याची संधी मिळणे आणि प.पू. भक्तराज महाराज यांनी पं. तळवलकर यांना आशीर्वाद देणे 

प.पू. भक्तराज महाराज रात्रभर भजने म्हणत असतांना मी तबलावादन केले आहे. ते स्वतः भजने म्हणायचे आणि मी तबला वाजवत असे. प.पू. भक्तराज महाराज एका वेगळ्याच अवस्थेत भजने म्हणायचे. हे आम्ही स्वतः पाहिले आहे. त्यांच्या पालघर (मुंबई) येथील भजनांच्या कार्यक्रमाच्या वेळी मी त्यांना साथसंगत केली होती. त्या वेळी त्यांनी मला पुष्कळ आशीर्वाद दिले.

७. संतांच्या सान्निध्यात तबलावादन करतांना मी जे अनुभवतो, ते शब्दातीत असते !

‘मला अनेक संतांसमोर तबलावादन करण्याची संधी मिळाली आहे’, त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. मी प.पू. भक्तराज महाराज यांना तबल्याची साथसंगत केली आहे. मी प.पू. नाना महाराज तराणेकर आणि प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधरस्वामी यांच्या समोर अनेक वेळा तबलावादन केले आहे. मला संतांचे पुष्कळ आशीर्वाद लाभले आहेत. हे दैवी योगच असतात. संतांच्या सान्निध्यात तबलावादन करतांना जे जाणवते, त्याचे शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे.’’

(‘संतांतील चैतन्यामुळे त्यांच्या सान्निध्यात अनेकविध अनुभूती येतात आणि त्या सूक्ष्म स्तरावर असल्याने त्यांचे वर्णन करणे अशक्य असते.’ – संकलक)

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी     ६२ टक्के,), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.४.२०२३)

पं. सुरेश तळवलकर यांचा परिचय

पं. सुरेश तळवलकर

पं. सुरेश तळवलकर प्रसिद्ध तबलावादक आहेत. ते पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा जन्म कीर्तनकार कुटुंबात झाला असून त्यांना लहानपणापासूनच धार्मिकता आणि संगीत यांची आवड आहे. त्यांचे तबल्याचे प्राथमिक शिक्षण त्यांचे वडील (कै.) दत्तात्रय तळवलकर यांच्याकडे झाले. त्यानंतर त्यांचे तबलावादन आणि संगीत यांतील पुढील शिक्षण पं. पंढरीनाथ नागेशकर, पं. विनायकराव घांग्रेकर, पं. गजाननबुवा जोशी आणि पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडे झाले.

करवीर पिठाचे शंकराचार्य विद्याशंकर भारती यांनी वर्ष २००१ मध्ये पं. सुरेश तळवलकर यांना ‘तालयोगी’ या पदवीने सन्मानित केले. पं. सुरेश तळवलकर यांना ‘पद्मश्री’, ‘संगीत नाटक ॲकॅडमी पुरस्कार’, अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे देश-विदेशात एकल तबलावादनाचे अनेक कार्यक्रम होत असतात. त्यांनी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकारांना तबल्यावर साथसंगत केली आहे.