देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या मेधा-दक्षिणामूर्ति यागाच्या वेळी सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !

१७.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात मेधा-दक्षिणामूर्ति याग झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. यागाची पूर्वसिद्धता चालू झाल्यावर आश्रमातील सात्त्विकता आणि चैतन्य वाढणे

शिष्यगणांसमवेत श्री दक्षिणामूर्ति

याग होण्याआधी एक आठवड्यापासून देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील परिसरात स्वच्छता चालू झाली होती, उदा. नदीच्या कडेने असलेल्या झाडांभोवती वीटा लावून सुशोभीकरण करणे, गोमयाने भूमी सारवणे इत्यादी. तेव्हा आश्रमात काय होणार आहे ?, हे कुणालाच ठाऊक नव्हते; परंतु परिसरामध्ये सात्त्विकता आणि चैतन्य वाढत होते. काहीतरी शुभकार्य होणार आहे, असे सर्व साधकांना वाटत होते.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आश्रमातील वास्तव्यामुळे आश्रमात प्रचंड उत्साह, चैतन्य अन् आनंद जाणवणे 

पू. शिवाजी वटकर

यागाच्या २ दिवस आधी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि १ दिवस आधी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आश्रमात आल्या. जणूकाही चैतन्याच्या गंगा-यमुना आश्रमात अवतरल्या असून जगभरातील साधकांना त्या चैतन्यशक्ती देत आहेत, असे मला वाटले. त्यांच्यामुळे आश्रमातील साधकांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर झाले, तसेच आश्रम परिसर आणि साधक यांच्यामध्ये प्रचंड उत्साह, चैतन्य अन् आनंद जाणवू लागला.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि महर्षि यांच्या कृपेेने झालेल्या मेधा-दक्षिणामूर्ति यागाच्या वेळी आलेल्या अनुभूती

अ. याग सत्यलोकात होत आहे, असे मला जाणवले.

आ. विधीमध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सहभागी असल्या, तरी त्या आम्हा सर्व साधकांसह विधी करत आहेत, असे मला जाणवले.

इ. यागाचा लाभ घेण्यासाठी ऋषिमुनी, देवता, चराचरातील जीव आणि सृष्टी सूक्ष्मातून उपस्थित असल्याचे मला अधूनमधून जाणवत होते.

ई. मला पाठीचा त्रास असल्याने मी सलग अर्ध्या घंट्यापेक्षा अधिक वेळ आसंदीत बसू शकत नाही; परंतु यागाच्या वेळी मी अनुमाने ४ घंटे आसंदीत बसू शकलो आणि त्यानंतर मला कसलाच शारीरिक त्रास झाला नाही. तेथील चैतन्यामुळे मी माझे अस्तित्व विसरलो होतो. त्यानंतर मला माझे शरीर पुष्कळ हलके वाटत होते.

उ. यागातील ज्वाळांमध्ये माझे स्वभावदोष, अहं आणि अनिष्ट शक्तीचे काळे (त्रासदायक) आवरण जळत असून मला सकारात्मक अन् आनंददायी ऊर्जा मिळत आहे, असे जाणवत होते.

ऊ. याग झाल्यावर साधक आणि वातावरण चैतन्याने फुलून गेले. साधकांना व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा करण्यास प्रेरणा मिळाली.

४. कृतज्ञता

अशा प्रकारचा दैवी याग देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात होईल, याची माझ्यासारख्या साधकांनी कल्पनाही केली नव्हती, तरीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या असीम कृपेने आम्हा साधकांना यागरूपी चैतन्याची अनमोल भेट मिळाली, त्याबद्दल मी परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.३.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक