मणेराजुरी (तालुका तासगाव, जिल्हा सांगली) येथील श्री. जीवन पाटील (वय ४५ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या पत्नीला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री. जीवन पाटील
सौ. उज्ज्वला पाटील

१. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला लागल्यावर यजमानांचा स्वभाव शांत होणे

आम्ही १५ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहोत. साधनेत येण्यापूर्वी माझे पती श्री. जीवन यांचा स्वभाव रागीट होता; परंतु सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार नामजप आणि सेवा करण्यास प्रारंभ केल्यानंतर त्यांचा स्वभाव शांत झाला आहे. आता त्यांना एखादी गोष्ट सांगितल्यास ते ती लगेच स्वीकारतात.

२. साधनेला प्रारंभ केल्यावर शेतीतून चांगले उत्पन्न मिळणे आणि घर बांधता येणे

आम्ही साधनेत येण्यापूर्वी आम्हाला रहायला घर नव्हते. नारळाच्या झावळ्यांपासून तयार केलेल्या छोट्याशा झोपडीसारख्या घरात आम्ही रहात होतो. आमच्याकडे शेत होते; पण शेतातून काही उत्पन्न येत नव्हते. त्यामुळे आम्ही सतत काळजीत असायचो. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला प्रारंभ केल्यानंतर आम्ही नामजप करत शेतात काम करू लागलो. आम्ही सात्त्विक उदबत्तीची विभूती शेतीच्या औषधांमध्ये घालून औषधांची फवारणी करत होतो. या उपायांमुळे शेतीसाठी अधिक व्यय न करताही शेतीतून चांगले उत्पन्न येऊ लागले. प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपाशीर्वादामुळे आता आमचे घर आहे. या अनुभूतीमुळे आम्हाला साधनेचे महत्त्व पटले आणि आम्ही साधना अन् सत्सेवा करण्यासाठी अधिक वेळ देऊ लागलो.

३. यजमानांनी प.पू. गुरुदेव कुटुंबियांची काळजी घेतील, असा भाव ठेवून प्रतिवर्षी रामनाथी (गोवा) येथे सेवेसाठी जाणे आणि त्या कालावधीत घरी कोणतीही अडचण न येणे

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी रामनाथी (गोवा) येथे अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशन आयोजित केले जाते. या अधिवेशनाच्या काळात माझे यजमान श्री. जीवन प्रत्येक वर्षी सेवेसाठी रामनाथी (गोवा) येथे जातात. त्या काळात कधीही त्यांना कुटुंंबियांची काळजी वाटली नाही. प.पू. गुरुदेव कुटुंबियांची काळजी घेणारच आहेत, असा त्यांचा भाव असतो आणि प.पू. गुरुदेवांच्या कृपेने त्या कालावधीत आम्हाला घरी कोणतीही अडचण येत नाही.

४. यजमानांनी मुलगी आणि पत्नी यांना साधना करण्यासाठी अनुमती देणे

माझी मुलगी कु. प्रेरणा (वय १६ वर्षे) हिला सनातनच्या आश्रमात राहून साधना करण्याची इच्छा होती. यजमानांनी तिला आश्रमात रहाण्यासाठी आनंदाने अनुमती दिली. त्यानंतर त्यांनी मलाही साधना करण्यासाठी अनुमती दिली.

५. यजमानांचा अपघात झाल्याने त्यांच्या गुडघ्याचे शस्त्रकर्म करावे लागणे, आधुनिक वैद्यांनी त्यांना एक वर्ष व्यवस्थित चालता येणार नाही, असे सांगणे; परंतु प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे त्यांना ३ मासांतच व्यवस्थित चालता येणे

मी काही कालावधीसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्यासाठी गेले होते. त्या कालावधीत यजमानांचा मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाल्यामुळे त्यांच्या गुडघ्याचे शस्त्रकर्म करावे लागले. शस्त्रकर्मानंतर आधुनिक वैद्यांनी त्यांना एक वर्ष व्यवस्थित चालता येणार नाही, तसेच त्यांचे सर्व जागेवरच करावे लागेल, असे सांगितले होते; परंतु प.पू. गुरुदेवांच्या कृपाशीर्वादामुळे ते ३ मासांतच व्यवस्थित चालू लागले.

६. रुग्णालयाचे देयक भरायला पैसे नसणे आणि यजमानांची श्रद्धा अन् भाव यांमुळे देयक माफ होणे

यजमानांच्या गुडघ्याचे शस्त्रकर्म केल्यानंतर रुग्णालयाचे देयक ४ लाख रुपये झाले होते. तेवढे पैसे आमच्याजवळ नव्हते. त्यामुळे माझ्या मनावर पुष्कळ ताण आला होता; परंतु यजमानांच्या चेहर्‍यावर कुठेही काळजी किंवा ताण नव्हता. ते मला म्हणायचे, माझे गुरुदेव माझ्या पाठीशी आहेत. ते सर्वकाही ठीक करतील. त्या कालावधीत एका सरकारी योजनेमुळे आमचे रुग्णालयाचे देयक माफ झाले. यजमानांची पू. गुरुदेवांवरील श्रद्धा आणि भाव यांमुळेच आम्हाला ही अनुभूती आली.

७. शस्त्रकर्मानंतर यजमानांची सेवा करतांना त्यांच्या खोलीतून सुगंध येणे आणि साधक अन् नातेवाईक यांनाही खोलीत सुगंध येत असल्याचे जाणवणे

शस्त्रकर्म झाल्यावर यजमानांची सेवा करतांना मला कोणताही त्रास झाला नाही. त्यांची सेवा करतांना त्यांच्या खोलीतून सुगंध येत असे. काही साधक आणि नातेवाईक यजमानांना भेटण्यासाठी घरी यायचे. त्या वेळी ते यजमानांना म्हणायचे, तुमच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर तुम्ही आजारी आहात, असे वाटत नाही; तसेच तुमच्या खोलीत आल्यावर सुगंध येतो आणि आनंद वाटतो. त्या वेळी यजमान त्यांना म्हणायचे, ही सर्व प.पू. गुरुदेवांची कृपा आहे. त्यांना सर्व साधकांची काळजी आहे. आपण केवळ स्थिर रहायचे.

८. पायाचे शस्त्रकर्म झाल्यामुळे व्यवस्थित चालता येत नसतांनाही मुलाचे संपूर्ण दायित्व स्वतः घेऊन पत्नीला सेवेसाठी आश्रमात पाठवणे

शस्त्रकर्मानंतर काही दिवसांतच यजमानांनी मला रामनाथी (गोवा) येथील आश्रमात सेवेसाठी पाठवले. पायाचे शस्त्रकर्म झाल्यामुळे त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हते, तरीही त्यांनी आमचा मुलगा कु. ऋषिकेश (वय १२ वर्षे) याचे शाळेचे आणि इतर दायित्व स्वतः घेतले अन् मला सेवेसाठी आश्रमात पाठवले.

९. गुरुपौर्णिमेला झोकून देऊन सेवा करणे

वर्ष २०२२ मध्ये तासगाव (जिल्हा सांगली) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव झाला. या महोत्सवाच्या वेळी यजमानांना एका पायाने व्यवस्थित चालता येत नसतांनाही ते सेवा करत होते. त्या वेळी मी त्यांना विचारले, तुम्हाला सेवा करायला जमेल का ? तेव्हा ते मला म्हणाले, हे गुरूंचे कार्य आहे. आपण काहीच करत नाही. तेच आपल्याकडून सर्व करवून घेतात.

प.पू. गुरुदेवांच्या कृपाशीर्वादामुळेच मी हे लिखाण करू शकले, त्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

– सौ. उज्ज्वला जीवन पाटील (वय ३५ वर्षे), मु.पो. मणेराजुरी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. (७.८.२०२२) 

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक