नोएडा (उत्तरप्रदेश) येथे बारमध्ये ‘रामायण’ मालिकेच्या ‘रिमिक्स’वर नृत्य !

मालक आणि व्यवस्थापक यांना अटक

(रिमिक्स म्हणजे मूळ गाणे, प्रसंग, संवाद यांची गती, संगीत आदींमध्ये पालट करणे)

बारमध्ये ‘रामायण’ मालिकेच्या ‘रिमिक्स’वर नृत्य

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील ‘गार्डन गॅलेरिया’ ‘मॉल’मधील (मोठ्या व्यापारी संकुलातील) ‘लॉर्ड ऑफ द ड्रिक्स रेस्टो’ या बारचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात मद्य पार्टीमध्ये रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिका रिमिक्स करून  दाखवण्यात येत आहे. त्या वेळी काही लोक नाचतांना आणि गातांना दिसत आहेत. मालिकेतील श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धाचे दृश्य मोठ्या पडद्यावर दिसत आहे. मालिकेतील संवाद ऐकवले जात असतांना संगीतही वाजत आहे. या प्रकरणी नोएडा पोलिसांनी स्वत:हून गुन्हा नोंदवून बारचा मालक माणिक अग्रवाल आणि व्यवस्थापक अभिषेक सोनी यांना अटक केली, तर संगीत वाजवणारा ‘डीजे’ (डिक्स जॉकी) याचा शोध घेतला जात आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

टि्वटरवर हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. त्यात पोलिसांना ‘टॅग’ करून (सूचित करून) लिहिण्यात आले होते, ‘नोएडामध्ये उघडपणे हिंदु धर्माची खिल्ली उडवली जात आहे. यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा तोडफोड झाल्यास त्यास ते (बारचे मालक) उत्तरदायी असतील.’

संपादकीय भूमिका

हिंदुबहूल भारतात हिंदु धर्म, देवता, धर्मग्रंथ, संत आणि राष्ट्रपुरुष यांच्या अवमानाच्या विरोधात कठोर कायदा नसल्यानेच कुणीही उपटसुंभ अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांची टिंगलटवाळी करण्याचे धाडस करतो ! हे रोखण्यासाठी सरकारने अशांवर जरब बसवणारा कायदा तात्काळ केला पाहिजे !