‘जी-२०’ परिषदेसाठी गोव्यात ५० सहस्र वृक्षांची लागवड होणार !

रोपट्यांची चोरी होण्याची भीती

पणजी, १० एप्रिल (वार्ता.) – गोवा राज्यात ‘जी-२०’ परिषदेसाठी सिद्धता करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सौंदर्य वाढावे, यासाठी गोवा सरकारने सुमारे ५० सहस्र झाडांची रोपे लावण्याचे ठरवले आहे. राज्यातील वाढती उष्णता आणि रोपट्यांची चोरी होण्याची शक्यता यांची भीती प्रशासनाला सतावत आहे.

‘जी-२०’ परिषदेच्या बैठकांसाठी महनीय व्यक्ती आणि मंत्रीगण यांचे गोव्याच्या पेडणे येथील ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ आणि दाबोळी येथील ‘गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ’ येथे आगमन होणार आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोपा ते धारगळ आणि धारगळ ते गिरी या ठिकाणी वृक्षरोपण मोहीम हाती घेण्यास सांगण्यात आले आहे, तसेच गोवा सरकारचे वन खाते राज्यात २५ कि.मी. क्षेत्रांमध्ये वृक्षारोपण करणार आहे. पणजी महानगरपालिकेला शहरात फुलझाडे लावण्यास सांगण्यात आले आहे, तर गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ ‘अटल सेतू’च्या खाली हिरवळ आणि फुलझाडे लावणार आहे. वनविभागाचे उपसंरक्षक विशाल सुर्वे म्हणाले, ‘‘नुकतीच लावलेली रोपटी उपटण्यास सोपे असल्याने त्यांची चोरी होण्याची शक्यता आहे. ही समस्या आम्हाला भेडसावत आहे; मात्र यावर केवळ देखरेख ठेवण्याव्यतिरिक्त आमच्याकडे अन्य कोणताही पर्याय नाही.’’