दैनिक ‘सनातन प्रभात’साठी पत्रकारिता करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेले बाळकडू आणि अनुभवलेली त्यांची कृपा  !

दैनिक ‘सनातन प्रभात’ला यावर्षी २ तपे (२४ वर्षे) पूर्ण होत आहेत. मी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचा पहिल्या अंकापासूनचा वाचक आहे. गुरुकृपेने मला वर्ष २००२ ते वर्ष २००६ या कालावधीत दैनिक ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर म्हणून सेवा करण्याची सुसंधी लाभली. पुढे वर्ष २०१५ पर्यंत संपादकीय विभागात सेवा करतांना मला अखंड गुरुकृपेची अनुभूती घेता आली. ही सेवा, दैनिक ‘सनातन प्रभात’ने माझ्यावर केलेले हिंदुत्वाचे संस्कार, त्यामुळे झालेला अलभ्य आध्यात्मिक लाभ आणि अपार गुरुकृपा इत्यादींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेख श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

८ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या पहिल्या भागात ‘वृत्तसेवा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लाभलेले मार्गदर्शन, विविध प्रसंगांचे वृत्तसंकलन करतांना वैचारिक दृष्टीकोन निर्माण होऊन त्याप्रमाणे लिखाण करता येणे’ आदी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.   

श्री. सागर निंबाळकर

संकलक : श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३ इ. ऑक्टोबर २००५ – ईश्वराच्या कृपेने परिवर्तनवाद्यांना तोंड देण्याचे धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण होणे : त्या मासात २ हिंदुविरोधी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठीच्या पत्रकार परिषदेला मी गेलो होतो. पत्रकार परिषदेत काही धर्मविरोधी विधाने करण्यात आली. तेव्हा मी तेथे त्यांची काही सूत्रे खोडून काढणारे प्रश्न विचारले. तेथे बसलेल्या कार्यकर्त्यांना माझा राग आला. ‘सनातन प्रभात’मध्ये या पत्रकार पिरषदेचे वृत्त संबंधित सूत्रांच्या वैचारिक खंडनासह प्रसिद्ध झाले. त्यानंतर ते कार्यकर्ते आणखी चिडले होते. त्याची मला कल्पना होती.

मी त्या कार्यक्रमासाठी नाट्यगृहात जाऊ लागलो, तेव्हा नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळच पत्रकार परिषदेच्या वेळी उपस्थित असलेल्या १०-१२ कार्यकर्त्यांनी मला अडवले. तेव्हा झालेले संभाषण पुढीलप्रमाणे…

कार्यकर्ते : तुम्ही आमच्या पत्रकार परिषदेचे वृत्त चुकीचे दिले. तुम्हाला आम्ही आत जाऊ देणार नाही.

मी : तुम्ही धर्मविरोधी बोललात, तेच मी लिहिले. संपादकांनी त्यावर दृष्टीकोन दिले. मला तुम्ही कार्यक्रमाला बसू दिले नाहीत, तरी मी तुम्ही धर्मावर केलेली टीका प्रसिद्ध करणारच आहे.

कार्यकर्ते : तुम्ही ईश्वर पाहिला आहे का ?

मी : हो ! मी ईश्वर पाहिला आहे. गुरूंच्या रूपात ईश्वर केवळ पाहिला नाही, तर त्याच्या कृपेची अनुभूतीही मी प्रतिदिन घेतो. त्यामुळेच मी तुम्हा सर्वांसमोर न घाबरता बोलू शकतो.

कार्यकर्ते : (धमकीच्या स्वरात) तुम्ही निघून जा ! कार्यक्रमात आम्हाला व्यत्यय आणायचा नाही.

मीही त्यांची संख्या पाहून माघार घेतली आणि निघून आलो. सदर कार्यक्रमातील सूत्रे गुरुकृपेने मला मिळाल्याने ‘सनातन प्रभात’मध्ये पुन्हा त्या कार्यक्रमातील धर्मावरील टीका आणि सविस्तर खंडन प्रसिद्ध झाले. हा प्रसंग आठवल्यावर आता मला लक्षात येते की, तेव्हा माझ्यामध्ये एवढ्या लोकांसमोर बोलण्याचे धैर्य, आत्मविश्वास आणि समयसूचकता केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच आली होती.

३ ई. सप्टेंबर २००९ – ईश्वराने आमच्यामध्ये निर्माण केलेल्या धर्मप्रेमाची अनुभूती येणे : श्री गणेशोत्सवात अफझलखानवधाचे चित्र असलेली कमान एका गणेशोत्सव मंडळाने उभी केली होती. त्यामुळे चिडलेल्या धर्मांधांनी ३ सप्टेंबर २००९ या दिवशी एका गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीवर दगडफेक केली. परिणामी दोन्ही बाजू आक्रमक झाल्याने दंगल झाली. या वेळी वार्ताहर म्हणून मी आणि श्री. सचिन कौलकर त्या ठिकाणी उपस्थित होतो. समोरून धर्मांधांकडून आमच्यावर दगडफेक होत होती; मात्र आम्हाला एकही दगड लागला नाही. पोलिसांनी लाठीमार केल्यावर एक काठी माझ्या पाठीवर बसली; मात्र त्याचा विशेष मार लागला नव्हता. अन्य हिंदूंच्या पाठीवर वळ उठले, तसा वळ उठला नव्हता. या वेळी आम्ही जे काही वृत्तसंकलन करायचो, जे दृष्टीकोन लिहायचो, ते वाचून संपादक आमच्या वृत्तसंकलनाचे पुष्कळ कौतुक करायचे. या वेळी अनेक हिंदू दैनिक ‘सनातन प्रभात’ मागून घेत असत. काही हिंदु मंडळांनी त्यांच्या फलकांवर ‘सनातन प्रभात’ चिकटवून हिंदूंचे प्रबोधन केले. अनेक हिंदूंनी आम्हाला ‘सनातन प्रभात’चा पुष्कळ आधार वाटतो’, असे कळवले. आम्हाला मात्र हे कौतुक म्हणजे ईश्वराने आमच्यामध्ये निर्माण केलेल्या  धर्मप्रेमाविषयी कृतज्ञता वाटायची.

४. वार्ताहर सेवा करतांना ईश्वराने विविध माध्यमांतून घडवणे

४ अ. अन्य वार्ताहरांच्या माध्यमातून शिकवणे : मी वार्ताहर झालो, तेव्हा एका जुन्या वार्ताहर साधकाने मला कोल्हापूर महानगरपालिका आणि तेथील वार्ताहर कक्ष दाखवला. त्यानंतर सर्व काही मलाच शिकायचे होते. तेव्हा विशेष ओळख नसतांनाही अन्य वार्ताहरांनी मला साहाय्य केले. काही वार्ताहर डाव्या विचारसरणीचे होते; मात्र त्यांनी कधीही माझा वा माझ्याशी बोलतांना ‘सनातन प्रभात’चा अवमान केला नाही. मी वयाने आणि अनुभवाने लहान होतो, तरीही उजव्या आणि डाव्या या दोन्ही विचारसरणींचे वार्ताहर साहाय्य करायचे. एखाद्या वृत्तात आध्यात्मिक सूत्र असेल, तर डाव्या विचारांचे वार्ताहरही आनंदाने सांगायचे, ‘सागर, तुझ्या वृत्ताचा मथळा ‘विद्यापिठात ज्ञानेश्वरी शिकवणे आवश्यक !’ असा असेल !’ या काळात काही वार्ताहरांनी केलेले अयोग्य वृत्तसंकलन पाहून ‘पत्रकारिता कशी नसावी ?’, हेसुद्धा शिकता आले.

४ आ. काही संघटनांच्या प्रमुखांच्या गुणांची जाणीव करून देऊन त्या माध्यमातून वार्ताहर साधकाला घडवणे

४ आ १. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे : यांची तत्त्वनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा, सुस्पष्ट विचार, हिंदुत्व इत्यादी गुण वृत्तसंकलन करतांना लक्षात घेतले. जर मी ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर नसतो, तर ‘एक कृतीशील शिवसैनिक’ झालो असतो, असे मला वाटायचे.

४ आ २. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एक नेते : यांना मी साधनेत येण्यापूर्वीपासून ओळखायचो. कोल्हापुरातील सर्व लोकांप्रमाणे मीही त्यांना त्यांच्या टोपण नावाने हाक मारायचो. त्यांनी मी ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर आहे; म्हणून कधीच व्यक्तीशः विरोध केला नाही. ते त्यांच्या पत्रकार परिषदांना मला आवर्जून बोलवायचे. शिक्षणक्षेत्रातील दुष्प्रवृत्ती, सहकार क्षेत्रातील अपप्रवृत्ती इत्यादींविषयी लेख लिहिण्यासाठी त्यांनी मला पुष्कळ माहिती दिली होती. शंकराचार्यांच्या विरोधातील आंदोलनात ते पुढे होते. तेव्हा मी त्यांनी केलेल्या विधानांच्या खंडनाचा लेख लिहिला होता. त्यांनी तो वाचल्याचे मला व्यक्तीशः कळवले हाेते.

४ आ ३. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक नेते : आम्ही त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ते संयमाने देत. काही वेळा त्यांचे कार्यकर्ते आम्हाला पत्रकार परिषदेतून बाहेर जायला सांगत; मात्र हे नेते त्या कार्यकर्त्यांना थांबवत असत. ते काही प्रश्नांना बगलही देत. वेळेचे पालन करणे, साधी रहाणी, कार्यनिष्ठा हे त्यांचे काही गुण होते.

५. संतांकडून मिळालेले चैतन्य आणि प्रेम !

५ अ १. परात्पर गुरु पांडे महाराज : वर्ष २०१० मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यालय देवद आश्रमात स्थलांतरित करण्यात आले. आश्रमातील परात्पर गुरु पांडे महाराज यांना आम्ही ‘प.पू. बाबा’ म्हणायचो. प.पू. बाबा म्हणजे देवद आश्रमातील आम्हा साधकांसाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रतिरूपच होते. प.पू. बाबा अत्यंत बारकाईने दैनिक वाचून त्यातील चुका आम्हाला सांगायचे. चुकांमागील कारणे जाणून घेऊन ते त्यावर उपाययोजना सांगायचे. त्यांनी ‘दैनिकातील प्रत्येक चूक मला माझी वाटली पाहिजे’, असा भाव माझ्यात निर्माण व्हावा, यासाठी साहाय्य केले. ते चांगल्या लेखांसाठी खाऊ तर द्यायचेच; पण पाठीवरून हात फिरवून प्रेमळ शाबासकीही द्यायचे. आम्हाला सेवा करतांना स्वतःवर आलेले नकारात्मक शक्तींचे आवरण जाणवायचे नाही; पण प.पू. बाबा आम्हाला छातीशी कवटाळून, तर कधी पाठीवर त्यांची काठी फिरवून हे आवरण सहजतेने काढायचे.

 ६. वार्ताहरसेवेचे मला झालेले काही लाभ !

अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली काही तत्त्वे (उदा. काटकसर, समाजाला आवडते ते देण्यापेक्षा योग्य ते देणे) आत्मसात करण्यासाठी साहाय्य झाले.

आ. विविध संतांचे अद्वितीय सत्संग लाभले. त्यांची सेवा करण्याची आणि कृपा संपादन करण्याची संधी लाभली.

इ. पोलीस, न्यायालयीन प्रक्रिया, तसेच समाजाभिमुख होण्यातील भीती अल्प झाली. कोणत्याही समाजघटकाशी संवाद साधण्याचे धाडस निर्माण झाले.

ई. समाजातील योग्य-अयोग्य गोष्टींचे विश्लेषण त्रयस्थपणे करता येऊ लागले.

उ. क्षात्रतेजात वाढ झाली. तत्परता, वेळेचे पालन इत्यादी काही गुण आत्मसात करता आले.

ऊ. या सेवेमुळे अल्पांशाने का होईना समाजऋणाची परतफेड करण्याची आणि साधकांचे वृत्तांच्या माध्यमातून कौतुक करण्याची, तसेच त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची सुसंधी लाभली.

हे गुरुदेवा, आपल्या कृपेने इतके सारे आध्यात्मिक लाभ झाले आहेत की, त्यासाठी असा एखादा लेख लिहिणे, म्हणजे आपल्या कृपासागरातील केवळ एका थेंबाचे वर्णन करणे

होय ! ही संधी ‘सनातन प्रभात’च्या २४ व्या वर्धापनदिनामुळे लाभली, यासाठी मी आपल्या आणि ‘सनातन प्रभात’च्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे !

(समाप्त)

– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०२३)

प.पू. तोडकर महाराज यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती अपार कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यातून साधकाला दायित्वाची जाणीव होणे

कोल्हापूर येथील हनुमानभक्त प.पू. तोडकर महाराज यांच्याशी अध्यात्माविषयी चर्चा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जानेवारी २००५ मध्ये कोल्हापूर येथील हनुमानभक्त भक्तवत्सल सद्गुरु श्री तोडकर महाराज (प.पू. तोडकर महाराज) यांना काही तरुणींचा विनयभंग केल्याचे कारण पुढे करून षड्यंत्रपूर्वक अटक झाली. तेव्हा मी मिरज येथील सनातनच्या आश्रमात एका साधना शिबिरात सहभागी झालो होतो. मला संपादकीय विभागातून प.पू. तोडकर महाराजांशी संबंधित प्रसंगात वृत्तसंकलनासाठी कोल्हापूर येथे जायला सांगण्यात आले, त्याप्रमाणे मी गेलो.

कोल्हापूर येथील सर्व वृत्तपत्रांमध्ये प.पू. महाराजांच्या विरोधात लिखाण येत होते. तेव्हा केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प.पू. तोडकर महाराज निर्दाेष असल्याचे सुस्पष्टतेने प्रसिद्ध करण्यात येत होते. (पुढे न्यायालयातही तेच स्पष्ट झाले.) प.पू. महाराजांना मी भेटलो. ते म्हणाले, ‘‘समस्त संतांमध्ये केवळ प.पू. डॉक्टरांनी (प.पू. महाराज सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रेमपूर्वक ‘प.पू. डॉक्टर’ असे संबोधायचे. – संकलक) मला भ्रमणभाष करून धीर दिला. त्यांचे चरण कधीही सोडू नकोस.’’ प.पू. महाराजांच्या डोळ्यांतून या वेळी कृतज्ञतेचे अश्रू वहात होते. ते पाहून मीही धन्य झालो. ‘आपल्या गुरूंच्या संदर्भात एका अन्य संतांना जेवढी कृतज्ञता वाटते, तशीच कृतज्ञता मलाही वाटायला हवी. त्यासाठी प.पू. महाराजांवरील प्रत्येक आरोप परतवून लावण्याची सेवाच जणू देवाने मला दिली आहे’, असे वाटले. त्यानंतर मी देवाला पुष्कळ प्रार्थना करू लागलो. प.पू. महाराजांवर वर्तमानपत्रांतून केलेल्या सर्व टीकांची कात्रणे जमवली. प्रतिदिन त्यांचे खंडण दैनिक कार्यालयात पाठवू लागलो. हे खंडण दैनिक  ‘सनातन प्रभात’मधून त्या-त्या दिवशी प्रसिद्ध केले जात होते. यातून ‘प.पू. महाराजांवरील आरोप, ही अफवा कशी आहे ?’ हे जनमानसापर्यंत पोचवण्यात दैनिक ‘सनातन प्रभात’ यशस्वी झाले.

पोलीस प.पू. तोडकर महाराज यांना न्यायालयात नेत असतांना मी वार्ताहर म्हणून नेहमी त्यांच्या समवेत जात असे. तेव्हा प.पू. महाराज माझे निरीक्षण करत असत. पुढे प.पू. महाराज जामिनावर मुक्त झाले. त्यानंतर मी त्यांना भेटायला त्यांच्या द्रोणागिरी आश्रमात गेलो. तेव्हा प.पू. महाराजांनी मला छातीशी कवटाळले. डोक्यावरून हात फिरवला. तोंडात पेढा भरवला. ते अन्य भक्तांना म्हणाले, ‘‘हा बघा, सर्व वार्ताहरांमध्ये हा एकमेव आपला वार्ताहर होता. सगळे वार्ताहर कितीही दंगा घालत असले, उलटसुलट प्रश्न विचारत असले किंवा खोटे लिहीत असले, तरी सागर शांत बसून त्याच्या सेवेकडे लक्ष देत असे. ‘आपल्यावरील आरोपांना कसे वैचारिकदृष्ट्या परतवून लावायचे ?’, ते सागरने दाखवून दिले. असे उत्तम साधक प.पू. डॉक्टरांनी सिद्ध केले आहेत. प.पू. डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे !’’ प.पू. महाराजांचे हे शब्द मला नेहमी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे चरण मानसरित्या घट्ट पकडून ठेवण्यासाठी साहाय्य करतात.

– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.