कोल्हापूर, १० एप्रिल (वार्ता.) – गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी एस्.टी. प्रशासन प्रयत्न करत आहे. त्या अंतर्गत राज्यात पहिली पुणे-नगर इलेक्ट्रिक बस वाहतूक सेवा चालू करण्यात आली आहे. यानंतर आता लवकरच कोल्हापूर विभागासाठी कोल्हापूर-पुणे या मार्गासाठी १० इलेक्ट्रिक बस (कोल्हापूर विभाग – ५, पुणे विभाग – ५) मिळणार आहेत. या मासाच्या अखेरपर्यंत या गाड्या चालू होऊ शकतात. प्रवाशांना परवडणार्या दरात, अत्यंत आरामदायी, प्रदूषणमुक्त अशा या गाड्या आहेत, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
१. कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवीन १० आरामदायी एस्.टी. (बी.एस्.-६ प्रकार) गाड्या मिळणार असून त्या राधानगरी आगारासाठी वापरण्यात येणार आहेत. या गाड्या अत्याधुनिक असून त्यात प्रत्येक आसनाखाली भ्रमणभाष भारित करण्यासाठी सोय करून देण्यात आली आहे. यातील गडहिंग्लज, तसेच इचलकरंजी आगारासाठी असलेल्या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
२. गेल्या काही वर्षांपासून एस्.टी. बाहेरच्या खासगी इंधन पंपांवर डिझेल भरत असे. यात वेळ जात असे, तसेच अन्य अडचणीही येत होत्या. हे धोरण आता पालटण्यात आले असून एस्.टी. आगारात असणार्या इंधन पंपांवरच डिझेल भरणे आता परत चालू करण्यात आले आहे. यामुळे डिझेल भरण्याचा वेळ वाचल्याने प्रवाशांचाही तेवढा वेळ वाचत आहे. कोल्हापूर विभागासाठी प्रतिदिन ५० सहस्र लिटर डिझेल लागते.
३. वाढत्या गाड्यांमुळे, तसेच वाढत्या प्रवासी संख्येमुळे सध्या कोल्हापूर आगारात गाड्यांची गर्दी होत आहे; मात्र शिरोली येथील, तसेच अन्य काही ठिकाणची कामे पूर्ण झाल्यावर येथील आगारात अधिक जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गाड्यांची मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होईल.
४. उन्हाळी सुटीच्या कालावधीत प्रवाशांना अधिक प्रमाणात गाड्या उपलब्ध होण्यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई या मार्गावर अधिक गाड्या सोडण्यात येणार आहेत.
नुकत्याच झालेल्या जोतिबा चैत्र यात्रेसाठी कोल्हापूर विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी ५ एप्रिलला एका दिवसात ५०० फेर्या केल्या. या यात्रेच्या कालावधीत कोल्हापूर विभाग प्रवाशांसाठी अहोरात्र राबत होता. कोल्हापूर विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी जोतिबा येथे गेले होते. कोल्हापूर शहर बसस्थानकावरही प्रवाशांना माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. पंचगंगा नदीवरून जाणार्या भाविकांसाठीही एस्.टी.ने विशेष सोय केली होती. २ दिवस एस्.टी. अखंड गाड्या चालू होत्या. |