छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे कार्य समर्थ रामदासस्वामी आणि त्यांनी सांगितलेली बलोपासना अर्थात् श्री मारुतीची उपासना यांनी चोख केले. त्यासाठी समर्थांनी ११ ठिकाणी मारुति मंदिरांची स्थापना केली. भक्तीबरोबरच शक्तीचीही उपासना अर्थात् बलोपासना करण्याचे महत्त्व त्यांनी समाजमनावर बिंबवले. मन, मनगट आणि मेंदू बळकट असायला पाहिजे, हे त्यांनी स्वानुभवातून जाणले.
‘एक्झर्शन’ आणि ‘एक्झरसाईज’ या दोन शब्दांचा अर्थ शरिराला होणारे श्रम हाच आहे; पण त्यात मूलभूत भेद आहे. केवळ पोट भरण्यासाठी केले जाणारे कष्ट म्हणजे दमणे-भागणे होय. तो व्यायाम नव्हे; कारण त्या शारीरिक हालचाली व्यक्ती नाईलाजाने करत असते; पण मनात हेतू किंवा उत्तम विचार धरून त्यायोगे शरिराने अत्यंत शास्त्रशुद्ध आणि भक्तीपूर्वक उत्तम मार्गदर्शनाने केलेले कष्ट म्हणजे व्यायाम होय. शरीर कमावणे, घडवणे, योग्य प्रतिकारक्षम करणे म्हणजेच खर्या अर्थाने बलसंवर्धन होय. समर्थांनी समाजाला मारुतीच्या उपासनेचा क्रम लावून दिला. त्यामुळे बुद्धी, बळ, धैर्य, निर्भयत्व, आरोग्य आणि वाक्पटूत्व हे मारुतीचे गुण घेण्यासाठी समाजाला साहाय्य झाले. ज्याकाळी समर्थांनी समाजाला बलोपासनेचा मंत्र दिला, तशीच काहीशी परिस्थिती आजही आहे. समाज मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुदृढ नाही.
अलीकडे समाजात चाललेली हिंसक, घृणास्पद कृत्ये पाहिली की, विवेकी बलोपासनेचा रामदासस्वामींचा मंत्र किती त्रिकालदर्शी होता, याची सत्यता पटते. दुर्दैवाने सध्याची गतीशील जीवनपद्धत, जीवघेणी महत्त्वाकांक्षा, स्पर्धा, निकृष्ट आहार, अपुरी निद्रा, व्यायामाचा अभाव, शरिराच्या योग्य हालचालींचा अभाव, व्याधी झाल्यानंतर अथवा आधी तज्ञांकडे होणारे हेलपाटे, शरिरावर नको इतका औषध आणि उपचार यांचा मारा यांमुळे सुदृढ शरिराची प्रगती मंदावते. सुदृढ आणि निकोप शरिरावर दुष्परिणाम होतो. शरीर मजबूत असेल, तर मनही सुदृढ असते आणि सुदृढ मनाच्या ठिकाणी विचारही चांगलेच येतात. सांप्रतकाळीही बलोपासनेला पर्याय नाही. आपल्या शरिराला समर्थांची बलोपासना खचितच योग्य आहे. त्याच अनुषंगाने सशक्त आणि सक्षम शरिरासाठी नित्य योगाभ्यास, व्यायाम, समतोल आहार, तसेच सुदृढ अन् सुसंस्कारित मनासाठी ईश्वरसेवा, उपासना असे उपाय उपयुक्त ठरतील.
– श्रीमती धनश्री देशपांडे, रामनाथी, गोवा.