‘दंगलखोर’ मोकाट का ?

नुकताच भारतभरामध्ये श्रीरामनवमीचा उत्सव उत्साहात पार पडला; पण या आनंदमयी वातावरणाला काही धर्मांधांमुळे गालबोट लागले. हे गालबोट लावणारे धर्मांध दंगलखोर मोकाट आहेत. हिंदूंच्या धार्मिक उत्सवांच्या वेळी अशा अप्रिय घटना महाराष्ट्रातही घडल्या आणि महाराष्ट्रात कायद्याचा धाक आहे कि नाही ? असा प्रश्न जनसामान्यांच्या मनात निर्माण झाला. त्यामुळे ‘वारंवार होणार्‍या दंगलीच्या घटना रोखण्यासाठी ‘योगी पॅटर्न’ महाराष्ट्रातही राबवा’, अशी मागणी सामाजिक माध्यमांवर जोर धरू लागली.

उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार येण्यापूर्वी तिकडे ‘जंगलराज’ होते. पोलीसयंत्रणा या राजकारण्यांच्या हातातील बाहुल्या झाल्या होत्या. त्यामुळे सामान्यांना ‘न्याय कुणाकडे मागायचा ?’, असा प्रश्न पडायचा; परंतु योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यावर त्यांनी ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ राबवली. ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ म्हणजे गुन्हेगार आणि दंगलखोर यांच्याविषयी दया न दाखवता त्यांच्यावर तात्काळ अन् कठोर कारवाई करणे. ज्यामुळे गुंड, माफिया यांना राजाश्रय न मिळता तुरुंगाची हवा खावी लागली आणि जे पोलिसांनाही जुमानत नव्हते अन् पोलिसांवर गोळीबार करत होते, त्यांना ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे समाजकंटकांच्या मनात धाक बसला. त्या अंतर्गत गुन्हेगारांचे आर्थिक साम्राज्य उद्ध्वस्त करणे, त्यांच्या अवैध मालमत्ता बुलडोझरच्या साहाय्याने पाडणे, मालमत्ता विकून त्यांनी केलेल्या सार्वजनिक मालमत्तेची आर्थिक हानी भरून काढणे, पोलिसांनी गुन्हेगारांवर ४८ घंट्यांच्या आत कारवाई केल्यास त्यांना बक्षीस घोषित करणे, अशा उपाययोजनांमुळे शासकीय यंत्रणांना बळ आले आणि त्या जोमाने कायदेशीर आधार घेऊन काम करू लागल्या. परिणामी आधीच्या सरकारपेक्षा लुटमारी, दरोडे, हत्या, खंडणी, दंगली होणे यांमध्ये सरासरी ५० टक्क्यांहून अधिक घट झाली. २३ कोटी लोकसंख्या असलेल्या इतक्या मोठ्या राज्यामध्ये बहुतांश प्रमाणात त्यांनी शांतता प्रस्थापित करून दाखवली.

उत्तरप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्र पुष्कळ शांत आणि चांगला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये साधू-संतांवर आक्रमण होऊन धार्मिक उत्सवांमध्ये दंगली घडून दंगलखोर मोकाट रहाणे अपेक्षित नाही. त्यामुळे प्रशासनाला दंगलखोरांवर ‘योगी आदित्यनाथ’ यांच्याप्रमाणे तात्काळ कारवाई करणे अवघड नाही. प्रशासनाने दंगलखोरांवर लवकरच वचक बसवावा, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा !

– श्री. जयेश बोरसे, पुणे