भगवान द्वारकाधिशाच्या रूपातील १०८ फुटांची मूर्ती स्थापन करणार
द्वारका (गुजरात) – वाराणसीतील काशी विश्वनाथ, उज्जैन येथील ‘महाकाल लोक’ आणि मथुरा कॉरिडॉर (सुसज्ज मार्ग) यानंतर आता द्वारकेत ‘देवभूमी कॉरिडॉर’ होणार आहे. हे पश्चिम भारतातील सर्वांत मोठे आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. शिवराजपूर समुद्रकिनाराही विकसित करण्यात येणार आहे. गोकुळाष्टमीपासून या कॉरिडॉरचे काम चालू होणार आहे.
१. येथील बेट द्वारकेचे रूपांतर जागतिक पातळीवर करण्यात येणार आहे. येथे पर्यावरणपूरक पर्यटन, वॉटर स्पोर्ट्स, डॉल्फिन व्ह्यूइंग गॅलरीसह अनेक प्रकल्प करण्यात येणार आहेत.
२. द्वारकेतील सगळी मंदिरे जोडण्यात येणार आहेत. द्वारकाधीश मंदिर, रुक्मिणी-बलराम मंदिर, सांवलियाजी मंदिर, गोवर्धननाथ मंदिर, महाप्रभु बैठक, वासुदेव, हनुमान मंदिरापासून नारायण मंदिरापर्यंतचा समावेश आहे.
३. लक्ष्मीनारायण मंदिरातील अंगणात ऐतिहासिक झाड आहे. ऋषी दुर्वास यांनी तेथे तपस्या केली होती. याचेही रूप पालटण्यात येणार आहे. येथील गोपी तलावाचेही बांधकाम होणार आहे. महाभारतानंतर सर्व गोपिका याच तलावात सामावल्या होत्या. याच तलावातील मातीला ‘गोपीचंदन’ म्हटले जाते.
४. येथे ओखाहून बेट द्वारकेला जोडणार्या पूलाचे काम चालू आहे. या २ सहस्र ३२० मीटर लांब चौपदरी मार्गाला देशातील सर्वांत लांब ‘केबल स्टे ब्रिज’ म्हटले गेले आहे.
५. येथे भगवान द्वारकाधिशाच्या रूपातील १०८ फुटांची मूर्ती सिद्ध केली जाईल. ही श्रीकृष्णाची सर्वांत उंच मूर्ती म्हटली जाईल. ही मूर्ती गोमती किनारी पंचकुई क्षेत्रात उभारली जाईल. जन्माष्टमीला भूमीपूजन होईल.