गोवा : खोतीगाव, गावडोंगरी परिसरातील डोंगरांना आग !

खोतीगाव, गावडोंगरी परिसरातील डोंगरांना लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न करतांना अग्निशमन दलाचे कर्मचारी

काणकोण – गेल्या मासात म्हादई अभयारण्याला लागलेली आग थांबवण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले होते. त्यानंतर आता खोतीगाव आणि गावडोंगरी परिसरातील डोंगरांनाही आग लागली. खोतीगाव ग्रामपंचायतीतील बड्डे आणि आवळी गावांच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराला आग लागून वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. अग्नीशमन दलाच्या साहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी खोतीगाव अभयारण्यातील उनरा मीटर, पणसुलेमळ, येडा या ठिकाणीही आग लागली होती.

आग लागलेल्या वनक्षेत्रांत झाडे लावण्यासाठी गोवा सरकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार

पणजी, ८ एप्रिल (वार्ता.) – राज्य सरकार ड्रोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून आग लागलेल्या वनक्षेत्रांत वृक्षारोपण करण्याचा सराव करणार आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी ८ एप्रिलला दिली.

ते पुढे म्हणाले,

‘‘वृक्षारोपणासाठी वन खात्याद्वारे ५ वर्षांची योजना आणि इतर निरंतर योजना विकसित करून त्या कार्यान्वित केल्या जातील अन् पुढील ४ वर्षांत आम्ही महत्त्वपूर्ण पालट साध्य करू, याची आम्हाला निश्चिती आहे. पूर्वी वनांतील प्राण्यांना चरण्यासाठी पोषक असलेल्या मैदानात झाडे लावली जात होती. यामुळे वन्यप्राण्यांचे पोषण होत नव्हते. परिणामी त्यांनी मानवी वस्तीत शेतांवर आक्रमण केले आणि शेतकर्‍यांच्या पिकांची हानी केली. वन्यजिवांना लाभ होईल अशा प्रकारे वन व्यवस्थापन योजना कार्यवाहीत आणण्यास आम्ही सक्षम आहोत. याची निश्चिती करण्यासाठी आम्हाला तज्ञांसमवेत काम करणे आवश्यक आहे. कर्नाटक सरकारचे माजी मुख्य वन अधिकारी आणि वन्यजीव तज्ञ लुथरा अन् गोवा किनारी व्यवस्थापन क्षेत्राचे सदस्य सुजीत डोंगरे आम्हाला वन संवर्धनाच्या सूत्रावर साहाय्य करतील. ‘वन संरक्षण ही सक्ती नसून वचनबद्धता आहे’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनानुसार आम्ही वाटचाल करू. आम्ही राज्यातील विविध उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये यांना भेट देऊ. वन महासंचालक गोयल यांच्याशी आम्ही चर्चा केली असून वन्यजीव सफारी पार्कबद्दल आमच्याकडे एक योजना आहे. राज्यातील जंगलांचे जतन आणि जैवविविधता सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’’