गोव्यात इमारतींवरील पायाभूत सुविधा करात वाढ

इमारतींवरील पायाभूत सुविधा करात वाढ

पणजी, ६ एप्रिल (वार्ता.) – सरकारकडून निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर प्रकारच्या इमारतींवर घेतल्या जाणार्‍या पायाभूत सुविधा करात वाढ केल्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. निवासी इमारत किंवा १०१ चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक बांधकाम क्षेत्रफळ असलेल्या बांधकाम पायाभूत सुविधा कराचा प्रति चौरस मीटर दर खालीलप्रमाणे आहे.

प्रकार १ – समुद्रकिनार्‍यावरील पंचायतीचा भाग आणि गोव्यातील पणजी, म्हापसा, फोंडा, मडगाव आणि मुरगाव या शहरांमध्ये पायाभूत सुविधा कर २०० रुपयांवरून ३५० रुपये करण्यात आला आहे.

प्रकार २ – नगरपालिका आणि त्यांच्याशी संलग्न ग्रामपंचायत किंवा पणजी, म्हापसा, फोंडा, मडगाव आणि मुरगाव या ५ शहरांच्या शेजारील पंचायती यांमध्ये पायाभूत सुविधा कर २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आला आहे.

प्रकार ३ – इतर ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांमध्ये हा पायाभूत सुविधा कर २०० रुपयांवरून २५० रुपये करण्यात आला आहे.

अशाच प्रकारची पायाभूत सुविधा करातील दरवाढ व्यावसायिक इमारत, औद्योगिक इमारत आणि इतर इमारती यांवर करण्यात आली आहे. ‘गोवा पायाभूत सुविधा कर कायदा २००९’मध्ये त्यानुसार आता पालट करण्यात आला आहे.