प.पू. दास महाराज यांनी पू. (श्रीमती) राधा प्रभु (सनातनच्या ४४ व्या समष्टी संत, वय ८५ वर्षे) यांच्या निवासस्थानी दिलेली भावस्पर्शी भेट !

‘प.पू. दास महाराज (बांदा (जि. सिंधुदुर्ग)) यांचा दक्षिण कन्नड आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांतील आध्यात्मिक संस्थांना भेटी देण्याचा कार्यक्रम होता. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. (सौ.) माई) आणि काही शिष्य होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प.पू. दास महाराज यांना सांगितले होते, ‘‘मंगळुरू येथे गेल्यावर पू. (श्रीमती) राधा प्रभु (सनातनच्या ४४ व्या समष्टी संत) यांच्या घरी भेट द्या.’’ ते गुरुआज्ञेचे पालन करण्यासाठी आमच्या घरी आले होते.

प.पू. दास महाराज
पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी

१. आमच्या घरी येण्याआधीच प.पू. दास महाराज यांना ‘या घरात श्रीरामाचा वास आहे’, असे जाणवले.

२. प.पू. दास महाराज यांनी देवघरातील श्रीराम मूर्तीचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता दर्शवणे

आमच्या घरी आल्यावर प.पू. दास महाराज यांना देवघरातील श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती पाहून पुष्कळ आनंद झाला. त्यांनी मला देवघरातील श्रीरामाच्या मूर्तीचा इतिहास विचारला.

२ अ. देवघरात असलेल्या श्रीराम मूर्तीचा इतिहास ! : मी प.पू. दास महाराज यांना त्या मूर्तीचा इतिहास सांगितला, ‘‘अनुमाने ५० ते ५५ वर्षांपूर्वी माझ्या यजमानांनी ही मूर्ती उडुपी येथील एका प्रसिद्ध दुकानातून विकत घेतली होती. दुकानाच्या मालकाने मूर्तीचे मूल्य ८०० रुपये सांगितले होते. मूर्तीच्या किमतीविषयी त्यांचे बोलणे चालू असतांना दुसर्‍या गावातील एक व्यक्ती तिथे आली. त्या व्यक्तीने त्यांच्या गावात राममंदिर बांधले होते आणि ३ – ४ दिवसांनी ते राममंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करायचे होते. त्या व्यक्तीला यजमानांनी पसंत केलेली मूर्तीच आवडली होती आणि ती व्यक्ती त्या मूर्तीचे कितीही मूल्य देण्यास सिद्ध होती; परंतु तिच्या आधी माझे यजमान आले असल्याने यजमानांनी ८०० रुपये देऊन ती मूर्ती खरेदी केली. ती मूर्ती आमच्या घरीच यायची होती; म्हणून ती आमच्याकडे आली.’’

श्रीरामाच्या मूर्तीचा इतिहास ऐकून प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांना पुष्कळ आनंद झाला. मूर्ती पाहून प.पू. दास महाराज यांची भावजागृती झाली. श्रीरामाच्या या मूर्तीत पुष्कळ चैतन्य आहे.

३. प.पू. दास महाराज यांना घरामध्ये पुष्कळ चैतन्य जाणवणे

प.पू. दास महाराज मला म्हणाले, ‘‘तुमच्या घरात आणि तुमच्या अन् पू. भार्गवराम (सनातनचे पहिले बालसंत (वय ४ वर्षे, पू. (श्रीमती) राधा प्रभु यांचा पणतु)) यांच्या कक्षात पुष्कळ चैतन्य आहे.’’ हे ऐकून आम्हा सर्वांची भावजागृती झाली.

४. पू. विनायक कर्वेमामा (सनातनचे २३ वे व्यष्टी संत) यांनी प.पू. दास महाराज यांना चरणस्पर्श करून आलिंगन दिले. तेव्हा मला श्रीरामाने हनुमंताला प्रथम भेटीच्या वेळी दिलेल्या आलिंगनाच्या प्रसंगाची आठवण झाली.

५. प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांचा केलेला सन्मान !

आम्ही प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला अन् पू. (सौ.) माई यांची ओटी भरली. त्या प्रसंगी घरी उपस्थित असलेल्या सर्वांनी त्या दोघांना चरणस्पर्श करून नमस्कार केला. आमच्या घरातून निघतांना प.पू. दास महाराज पुन्हा देवासमोर उभे राहिले आणि त्यांनी श्रीरामाची स्तुती केली.’

– पू. (श्रीमती) राधा प्रभु (सनातनच्या ४४ व्या समष्टी संत), मंगळुरू (३०.१२.२०२१)


प.पू. दास महाराज घरी आल्यावर पू. भार्गवराम प्रभु (सनातनचे पहिले बालसंत, वय ५ वर्षे) यांची जाणवलेली भावस्थिती !

पू. भार्गवराम भरत प्रभु

१. ‘पू. भार्गवराम प्रभु यांनी प.पू. दास महाराज यांचा ‘वॉकर’ (वयस्कर लोकांना चालण्यासाठी आधार देणारे साधन) धरून त्यांना आदरपूर्वक आमच्या घरी आणले.

२. प.पू. दास महाराज बोलत असतांना पू. भार्गवराम यांचे अधूनमधून ध्यान लागत होते.

३. कुणीही न सांगता पू. भार्गवराम यांनी प.पू. दास महाराज यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला.  प.पू. दास महाराज यांनी त्यांना ‘उठ’, असे म्हणेपर्यंत ते उठले नाहीत. ते पाहून उपस्थितांची भावजागृती झाली.

४. पू. भार्गवराम यांनी पू. (सौ.) माईंना (प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांना) पाहून ‘आणखी एक आजी’, असे म्हणत आनंदाने मिठी मारून पापी दिली.

५. प.पू. दास महाराज यांनी पू. भार्गवराम यांना प्रसाद वाटण्यास सांगितले. ‘पू. भार्गवराम यांना प्रसादाचे महत्त्व समजले आहे’, या भावाने ते साधकांना प्रसाद देत होते.’

६. आमच्या घरातून प.पू. दास महाराज बाहेर पडल्यानंतर पू. भार्गवराम समाधान व्यक्त करत भावपूर्णपणे म्हणाले, ‘‘आज सर्व जण आले होते. किती छान झाले ना !’’

७. प.पू. दास महाराज यांनी पू. भार्गवराम यांना दिलेले मारुतीचे चित्र पू. भार्गवराम यांनी रात्री झोपतांना शेजारी ठेवले.

प.पू. दास महाराज, पू. (सौ.) माई, पू. कर्वेमामा, पू. (श्रीमती) राधा प्रभु आणि पू. भार्गवराम या सर्व संतांची उपस्थिती अन् त्यांच्यातील संवाद यांमुळे वातावरणात अपार चैतन्याची अनुभूती येत होती. हे भावपूर्ण वातावरण अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल सर्व संत आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. भवानी भरत प्रभु (पू. भार्गवराम प्रभु यांची आई), मंगळुरू. (३०.१२.२०२१)

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक,  प.पू. दास महाराज यांचे आशीर्वाद घेतांना पू. भार्गवराम,  पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी आणि  पू. विनायक कर्वेमामा

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक