हनुमानाने पंचमुखी रूप धारण करण्यामागील कार्यकारणभाव !

चैत्र पौर्णिमेला (आज) हनुमान जयंती आहे. त्या निमित्ताने…

१. अहिरावणाने श्रीराम अन् लक्ष्मण यांचे अपहरण करणे

‘प्रभु श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धाच्या वेळी एक वेळ अशी आली की, रावणाला साहाय्यासाठी स्वतःचा भाऊ अहिरावण याचे स्मरण करावे लागले होते. अहिरावण हा तंत्र-मंत्रामध्ये प्रकांड पंडित होता आणि तो भवानीदेवीचा अनन्यभक्त होता. रावणावरील संकट दूर करण्यासाठी त्याने एक सोपा उपाय काढला. ‘श्रीराम आणि लक्ष्मण यांचे अपहरण केले, तर युद्ध आपोआपच समाप्त होईल’, यासाठी त्याने अशी माया रचली की, श्रीरामाची संपूर्ण सेना गाढ निद्रेत असतांना आणि अहिरावणाने श्रीराम अन् लक्ष्मण यांचे अपहरण करून त्यांना निद्रावस्थेतच पाताळात नेले.

२. श्रीराम आणि लक्ष्मण यांना पाताळातून सोडवण्यासाठी हनुमानाने पंचमुखी रूप धारण करणे

सर्वांना जाग आल्यानंतर या संकटाची जाणीव झाली. बिभीषणाला हे रहस्य उलगडले की, असे दुःसाहस केवळ अहिरावणच करू शकतो. तेव्हा नेहमीप्रमाणे सर्वांची दृष्टी संकटमोचक हनुमानावर खिळून राहिली. हनुमान तात्काळ पाताळात पोचला. पाताळाच्या द्वारावर रक्षकाच्या रूपात असलेल्या मकरध्वजाशी हनुमानाने युद्ध करून त्याला पराजित केले. त्यानंतर तो जेव्हा पाताळातील महालात पोचला, तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण यांना बंदीवान केलेले पाहिले. तेथे वेगवेगळ्या दिशांना पाच दिवे लावलेले होते आणि भवानीदेवीच्या समोर श्रीराम अन्  लक्ष्मण यांना बळी देण्याची सिद्धता पूर्ण झाली होती. अहिरावणाचा अंत करायचा असेल, तर ते पाचही दिवे एकाच वेळी विझवले पाहिजेत. हे रहस्य ज्ञात होताच हनुमानाने पंचमुखी हनुमानाचे रूप धारण केले. उत्तर दिशेला वराह मुख, दक्षिण दिशेला नरसिंह मुख, पश्चिमेला गरुड मुख, आकाशाकडे हयग्रीव मुख आणि पूर्व दिशेला (कपिमुख) हनुमान मुख होते. या पाच मुखांना धारण करून त्याने एकाच वेळी सर्व दिवे विझवून अहिरावणाला ठार केले. त्यानंतर हनुमानाने श्रीराम आणि लक्ष्मण यांना बंधनमुक्त केले.

३. श्रीरामाने मकरध्वजाला पाताळाचे राज्य देणे

हनुमान सागर पार करत असतांना एका मगरीने त्यांच्या घामाचा एक थेंब ग्रहण केल्यामुळे तिला गर्भधारणा होऊन त्या मगरीने ‘मकरध्वजाला’ जन्म दिला होता. अशा प्रकारे ‘मकरध्वज हा हनुमानाचाच पुत्र आहे’, हे समजल्यावर श्रीरामाने हनुमानाला मकरध्वजाला पाताळाचे राज्य सोपवण्याचा आदेश दिला. हनुमानाने तात्काळ त्याचे आज्ञापालन केले आणि त्या दोघांना घेऊन सागर तटावरील युद्धस्थळावर परतला.

४. हनुमानाने मायिल (मही) रावणावर विजय प्राप्त करणे

भारतात कितीतरी ठिकाणी पंचमुखी हनुमानाची अद्भुत स्वरूपाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. यापैकी रामेश्वरमध्ये स्थापित पंचमुखी हनुमान मंदिरात त्याच्या भव्य मूर्तीविषयी एक वेगळीच कथा आहे. पुराणात वर्णन केलेल्या या कथेनुसार एक ‘मायिल (मही) रावण’ नावाचा असुर होता. एकदा त्याने भगवान विष्णूचे सुदर्शनचक्रच चोरून नेले. आंजनेय हनुमानाला ही गोष्ट समजली, तेव्हा त्याच्या मनात ‘ते सुदर्शनचक्र परत आणून भगवान विष्णूला सुपूर्द करावे’, अशी इच्छा जागृत झाली. मायिल (मही) रावण आपले रूप पालटण्यात प्रसिद्ध होता. हनुमानाचा संकल्प जाणून भगवान विष्णूने हनुमानाला आशीर्वाद दिला, त्यासह त्याच्या इच्छेनुसार वायुवेगाने जाण्याची शक्ती, तसेच गरुड मुख, भय उत्पन्न करणारे नरसिंह मुख, हयग्रीव आणि वराह मुखही त्याला प्रदान केले. पार्वतीदेवीने हनुमानाला कमल पुष्प आणि यम-धर्मराजाने त्याला ‘पाश’ नावाचे अस्त्र प्रदान केले. हा आशीर्वाद आणि या सर्व शक्तींसह हनुमानाने मायिल (मही) रावणावर विजय प्राप्त केला. तेव्हापासून हनुमानाच्या या पंचमुखी स्वरूपाला ही मान्यता प्राप्त झाली.

५. पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीची उपासना केल्यावर होणारे लाभ

असे मानले जाते की, हनुमानाच्या या पंचमुखी मूर्तीची उपासना केल्यावर कुणीही मनुष्य नरसिंह मुखाच्या साहाय्याने शत्रूवर विजय मिळवू शकतो. गरुड मुखाच्या साहाय्याने सर्व दोषांवर विजय प्राप्त करू शकतो. वराह मुखाच्या साहाय्याने सर्व प्रकारची समृद्धी आणि संपत्ती प्राप्त करू शकतो अन् हयग्रीव मुखाच्या साहाय्याने ज्ञान प्राप्त करू शकतो. हनुमान स्वतः त्या मनुष्यामध्ये साहस आणि आत्मविश्वास निर्माण करतो.’

– राजीव कुमार पांडेय

(साभार : मासिक, ‘मिस्टिक पॉवर’, मे २०१५)