बांगलादेशी असल्याचे समजून बेंगळुरू येथे अटक केलेल्या बंगाली हिंदु दांपत्याला जामीन

हिंदु दांपत्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांनी निःशुल्क कायदेशीर लढा दिला !

बेंगळुरू (कर्नाटक) – मूळचे बंगाल राज्याचे निवासी असलेले हिंदु दांपत्य श्री. पलाश अधिकारी आणि सौ. शुक्ल अधिकारी त्यांच्या १ वर्षाच्या बाळासमवेत कामानिमित्त बेंगळुरू येथे आले होते. त्यांना बेंगळुरू पोलिसांनी बांग्लादेशी नागरिक म्हणून ९ मासांपूर्वी अटक केली होती. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या या दांपत्याला  बेंगळुरू येथे कुणाचे साहाय्य नसल्याने ते असाहाय्य झाले होते. हे लक्षात येताच हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता असलेले दांपत्य अधिवक्त्या सौ. दिव्या बाळेहित्तल आणि अधिवक्ता उमाशंकर मेगुंडी यांनी त्यांच्यासाठी न्यायालयात कायदेशीर लढा दिला. त्यांनी प्रामाणिकपणे, निःशुल्क लढा दिल्याने २८ मार्च या दिवशी दंडाधिकारी न्यायालयाने हिंदु दांपत्याला जामीन संमत केला आहे.

हिंदु दांपत्याला निःशुल्क कायदेशीर लढा देऊन न्याय मिळवून देणार्‍या अधिवक्त्यांना हिंदु संघटनांनी, तसेच पीडित दांपत्याने धन्यवाद देऊन आभार व्यक्त केले आहेत.