सदानंद कदम यांना याचिका सुधारण्यास मिळाली अनुमती !

मुरुड (दापोली) येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरण

सदानंद कदम

रत्नागिरी – दापोली तालुक्यातील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी अटकेत असलेले सदानंद कदम यांना दापोली आणि रत्नागिरी येथील तहसीलदारांकडून अडीच कोटी रुपये  भरण्यासाठी बजावलेल्या नोटिसींना आव्हान देण्यासाठी याआधी प्रविष्ट केलेल्या याचिकेत सुधारणा करण्यास उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या मुरुड (दापोली) येथील ‘साई रिसॉर्ट’प्रकरणी व्यावसायिक भागीदार आणि सहकारी सदानंद कदम यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालयाने) अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सदानंद कदम यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात ‘रिट’ याचिका प्रविष्ट केली होती. त्यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयासह राज्ययंत्रणांच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायमूर्ती धनुका आणि गौरी गोडसे यांच्या खंडपिठापुढे सुनावणी झाली. त्यानंतर या याचिकेत सुधारणा करण्यासाठी न्यायालयाने अनुमती दिली आहे. याच वेळी कदम यांच्या अधिवक्त्यांनी ‘साई रिसॉर्टवर कारवाई करून संपत्ती जप्त केली जाईल’, अशी भीती व्यक्त केल्यानंतर ‘प्रशासकीय यंत्रणांनी कारवाई केल्यास न्यायालयात दाद मागू शकता’, असेही न्यायमूर्तींकडून कदम यांच्या अधिवक्त्यांना सांगण्यात आले.