सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यात २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार, तिघांना पोलीस कोठडी

एक मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न

दोडामार्ग – तालुक्यातील २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले असून या प्रकरणी अमित जंगले (वय १९ वर्षे, रहाणार डिचोली, गोवा), सागर तुकाराम सडेकर-नाईक (सडा, कर्नाटक) आणि शुभम् चोर्लेकर (सोनावल) या ३ युवकांवर ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडितांपैकी एक मुलगी गर्भवती असल्याचे समजते. या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने २ एप्रिल या दिवशी तिघांना २ दिवसांची पोलीस कोठडी बजावली.

संशयित जंगले याने एका मुलीशी १ जानेवारी २०२२ ते १५ मार्च २०२३ या कालावधीत बलपूर्वक लैंगिक अत्याचार केले. दुसर्‍या प्रकरणात अल्पवयीन मुलगी आणि संशयित सागर सडेकर-नाईक या दोघांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीतून त्याने मुलीला त्याच्या मावशीच्या घरी नेऊन ठेवले आणि तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले, तसेच चोर्लेकर यानेही मुलीच्या असाहाय्यतेचा लाभ उठवत लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे ती मुलगी गर्भवती राहिली.

पहिल्या प्रकरणात पीडित मुलीच्या भावाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अमित जंगले याला अटक केली आहे. दुसर्‍या प्रकरणात पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी सडेकर-नाईक आणि चोर्लेकर यांना अटक केली.