आज ३ एप्रिल २०२३ या दिवशी ‘महावीर जयंती’ आहे. त्यानिमित्त कोटी कोटी प्रणाम !
‘चैत्र शुक्ल त्रयोदशी या दिवशी जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म झाला. ते जैन धर्माचे प्रचारक होते. यांच्यापूर्वी पार्श्वनाथ नावाचे २३ वे तीर्थंकर सुमारे २५० वर्षांपूर्वी होऊन गेले. महावीर यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ होते. यांचा जन्म ‘ज्ञान’ नावाच्या क्षत्रिय कुळात झाल्यामुळे यांना ‘ज्ञानपुत्र’ असेही म्हणतात. महावीर हे राजपुत्र असले, तरी पहिल्यापासून ते विरक्त होते. एक तप प्रवास करून त्यांनी इंद्रिय दमन केले. कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी धर्माेपदेश करण्यात आणि इतरांना तपश्चर्येचे नियम समजावून सांगण्यात आपले आयुष्य खर्च केले. मगध येथील बिंबिसार राजाने यांच्यापासूनच दीक्षा घेऊन जैन धर्माचा स्वीकार केला होता. या काळातच वेदबाह्य अशा बुद्ध धर्माचा उदय झाला होता. ‘धर्माचरणास संन्यास दीक्षा आवश्यक आहे’, असे बुद्ध आणि जैन या दोनही पंथांचे मत होते. देवालये, तीर्थस्थाने, देवता, पूजाविधी वगैरे गोष्टींमध्ये जैन धर्माचे साम्य हिंदु धर्माशी दिसून येते. या पंथात ‘श्वेतांबरी’ आणि ‘दिगंबरी’ असे दोन भेद आहेत. हा भेद तत्त्वज्ञानाचा नसून धर्माचरणाचा आहे. जैन तत्त्वज्ञानांत ९ प्रमुख पदार्थ मानण्यात आले आहेतः १. जीव,२. अजीव, ३. पुण्य, ४. पाप, ५. आश्रव, ६. संवर, ७. बंध, ८. निर्जर, ९. मोक्ष.
जैन हे पुरुषरूपी ईश्वर मानत नाहीत. त्यांची जागा अनेक सिद्धस्थितीला पोचलेल्या आत्म्यांनी घेतली आहे; परंतु जैन मूर्तीपूजक असून त्यांच्यातही प्रार्थनाविधी आहे.’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), लेखक – प्रल्हाद नरहर जोशी)