विधवा प्रथेच्या विरोधात गोवा राज्यात कायदा करणार ! – महिला आणि बालविकास मंत्री विश्वजीत राणे

विधवा प्रथेच्या विरोधात गोवा राज्यात कायदा करणार !

पणजी, ३१ मार्च (वार्ता.) – आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी गोवा सरकार विधवा प्रथेच्या विरोधात कायदा करणार आहे, असे आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी ३१ मार्च या दिवशी गोवा विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधवांना दुजाभावाची वागणूक देणे, विधवांशी गैरवर्तन करणे आणि विधवांना समाजात स्थान न देणे या विधवा प्रथेतील कृती अयोग्य असल्याचे सांगून सरकारने त्वरित याविरोधात कृती करण्याची मागणी करणारा खासगी ठराव विधानसभेत मांडला. या वेळी मंत्री विश्वजीत राणे यांनी विधवा प्रथेच्या विरोधात कायदा करण्याचे आश्वासन देऊन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना ठराव मागे घेण्याची विनंती केली. मंत्र्यांच्या आश्वासनानंतर ठराव मागे घेण्यात आला.

प्रारंभी या ठरावावरील चर्चेत ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे आमदार वीरेश बोरकर, अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, भाजपच्या आमदार डिलायला लोबो, भाजपच्या आमदार डॉ. दिव्या राणे, काँग्रेसचे आमदार आल्टोन डिकोस्ता आणि ‘आप’चे आमदार वेंझी व्हिएगस यांनी सहभाग घेऊन ठरावाला समर्थन केले. (या सर्वांनी हिंदु धर्माविषयीचा अभ्यास केला आहे का ? – संपादक)

ठराव मांडतांना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, ‘‘विधवा प्रथा ही अमानवी, घटनाविरोधी आणि दुजाभाव करणारी असल्याने याविरोधात कायदा करतांना सार्वजनिक भावनांचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. आम्हाला धार्मिक क्षेत्रात सुधारणा करायची नाही, तर केवळ दुजाभाव करणार्‍या प्रथेला आमचा विरोध आहे.

(सौजन्य : OHeraldo Goa)

मी जन्माने ख्रिस्ती असलो, तरी मी ख्रिस्ती आमदार नाही, तर गोव्याचा एक आमदार आहे. गोव्यात समान नागरी कायदा अस्तित्वात असल्यानेही सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजेत. समाजाची मानसिकता पालटणे कठीण असले, तरी कायदा केल्याने विधवा प्रथा बंद करण्यासाठी कृतीशील असलेल्या अशासकीय संस्था, सामाजिक कार्यकर्ते आदींना बळ मिळणार आहे.’’

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये म्हणाले, ‘‘विधवा प्रथेच्या विरोधात गोव्यातील एकूण १४ पंचायतींनी ठराव घेतला आहे आणि गोव्यात अशा प्रथेच्या विरोधात कायदा केल्यास गोवा राज्य हे असा कायदा करणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.’’

आमदार डिलायला लोबो म्हणाल्या, ‘‘विधवा प्रथेचे पालन करणे हे ऐच्छिक ठेवावे आणि कुणावरही बंधनकारक करू नये.’’

आमदार डॉ. दिव्या राणे म्हणाल्या, ‘‘यापूर्वी ‘सती’, बालविवाह आदी गैरप्रथा नष्ट झालेल्या आहेत. विधवा प्रथेच्या विरोधात कायदा झाल्यास ते पुरोगामी पाऊल ठरेल.’’

मंत्री विश्वजीत राणे पुढे म्हणाले, ‘‘विधवा प्रथा बंद झाली पाहिजे याविषयी सर्व सदस्यांमध्ये एकमत आहे. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावून कायदेतज्ञांच्या सल्ल्यानुसार विधवा प्रथेच्या विरोधात कायद्याचे प्रारूप सिद्ध केले जाणार आहे.’’ (हिंदु धर्मातील परंपरांच्या विरोधात कायदा करण्यापूर्वी केवळ कायदेतज्ञांचा सल्ला न घेता हिंदु धर्मातील आध्यात्मिक अधिकार्‍यांचा सल्लाही घेणे आवश्यक आहे ! – संपादक)


हे ही वाचा –

गोवा : विरोधी पक्षनेते युरी आलेमाव विधवा भेदभाव प्रथा बंद करण्यावर खासगी ठराव मांडणार
https://sanatanprabhat.org/marathi/663778.html

हिंदू धर्म समर्थ, विधवा प्रथेबाबतच्या खासगी ठरावावर बजरंग दलाचे फळदेसाई यांची टीका
https://www.dainikgomantak.com/goa/goa-bajrang-dal-criticizes-yuri-alemao-private-motion-on-window-ppy92

संपादकीय भूमिका

  • असाच कायदा मुसलमानांच्या महिला घालत असलेला हिजाब, बुरखा, हलाला पद्धत यांविरोधात करणार का ?
  • स्त्रीने पतीच्या निधनानंतर धर्माने सांगितलेल्या कृतींचे पालन केल्यामुळे पती आणि पत्नी दोघांनाही लाभ होत असल्याचे हिंदु धर्म सांगतो ! राजमाता जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई या विधवा असूनही त्यांनी कर्तृत्व गाजवले. यावरून हिंदु धर्मात विधवांना दुजाभावाची वागणूक दिली जात नाही, हे स्पष्ट होते !
  • विधवा धर्माचे पालन करणे, हे प्रत्येकाचे व्यक्तीस्वातंत्र्य असल्याने कुणाला विधवा धर्माचे पालन करायचे असल्यास कायदा तिला तसे करण्यापासून रोखणार का ?