गोवा : विरोधी पक्षनेते युरी आलेमाव विधवा भेदभाव प्रथा बंद करण्यावर खासगी ठराव मांडणार

मडगाव – विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात कामकाजात प्रविष्ट करून घेण्यासाठी २ खासगी सदस्य ठराव मांडले असून पहिला ठराव विधवा भेदभावाची अन्यायकारक प्रथा थांबवण्यासाठी आणि अंत्यसंस्काराच्या वेळी मृत स्त्री-पुरुषांचे कपडे काढण्याची प्रथा बंद करण्याच्या मागणीसाठी असून दुसरा ठराव गोव्यातील अलीकडील आगीच्या घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी, तसेच भूस्खलन अन् किनारपट्टीवरील मातीची धूप यावर अभ्यास करण्याची मागणी करणारा आहे. हे दोन्ही ठराव अधिवेशनाच्या कामकाजात सूचीबद्ध झाल्यास ३१ मार्च या दिवशी चर्चेसाठी येणार आहेत.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

आपल्या पहिल्या ठरावात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘राज्यातील विधवा भेदभाव, विधवा अत्याचार आणि विधवा विलगीकरण या अन्यायकारक प्रथा बंद करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची सरकारकडे मागणी केली आहे. विधवा भेदभाव आणि गैरवर्तन हे प्रकार परंपरा अन् धार्मिक किंवा सामाजिक प्रथेचा भाग म्हणून गृहीत धरले जातात अन् त्याविरुद्ध सहसा तक्रार नोंदवली जात नाही’, असे म्हटले आहे.

गोव्यातील काही ग्रामपंचायतींनी या प्रथांच्या विरोधात ठराव घेतले आहेत आणि विधवेला विवाहित स्त्रीच्या बरोबरीने वागणूक दिली पाहिजे, अशी मागणी केली आहे. सर्व अन्यायकारक प्रथांना आळा घालण्यासाठी सरकारने कायदा आणण्याचा विचार करावा, असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.

अंत्यसंस्काराच्या वेळी मृत स्त्री-पुरुषांना नग्न करण्याची अन्यायकारक प्रथा थांबवण्यासाठी आलेमाव यांची कायदा करण्याचा विचार !

ठरावात पुढे म्हटले आहे की, अंत्यसंस्काराच्या वेळी मृत स्त्री-पुरुषांना नग्न करण्याची अन्यायकारक प्रथा थांबवण्यासाठी जनजागृती करण्यासाठी हे सभागृह सरकारला जोरदार शिफारस करते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रतिष्ठेचा सन्मान आणि आदर करणे महत्त्वाचे आहे अन् अंत्यसंस्काराच्या वेळी मृत स्त्री-पुरुषांचे कपडे काढण्याची प्रचलित प्रथा मृत व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा अपमान आणि अवमान करणारी आहे. सरकारने अशा अन्यायकारक प्रथा बंद करण्यासाठी कायदा आणण्याचा विचार केला पाहिजे, असे ठरावात पुढे म्हटले आहे. (हिंदु धर्मात अशी प्रथा सांगितलेली नाही. यासाठी कायदा करण्याची आवश्यकता नाही ! हिंदूंनी धर्मशिक्षण घेतल्यास अशी प्रथा रोखता येईल. यासाठी हिंदूंनी सनातनच्या ‘मृत्यूनंतरच्या क्रियाकर्माचे शास्त्र’, या ग्रंथाचा अभ्यास करावा ! – संपादक)


हे ही वाचा –

विधवा धर्म : वास्तव आणि पुरोगामी कल्पना
https://sanatanprabhat.org/marathi/584786.html

संपादकीय भूमिका

  • हा ठराव मांडण्यापूर्वी युरी आलेमाव यांनी हिंदु धर्मशास्त्र जाणून घ्यावे, ही अपेक्षा !
  • विधवा ही प्रथा नसून तो धर्म आहे. स्त्रीने पतीच्या निधनानंतर धर्माने सांगितलेल्या कृतींचे पालन केल्यामुळे पती आणि पत्नी दोघांनाही लाभ होत असल्याचे हिंदु धर्म सांगतो !
  • विधवा धर्माचे पालन करणे, हे प्रत्येकाचे व्यक्तीस्वातंत्र्य असल्याने विधानसभेने यावर ठराव संमत करून काय साध्य होणार आहे ?
  • हिंदु प्रथा-परंपरात हस्तक्षेप करणारे युरी आलेमांव मुसलमानांच्या हिजाब घालणे, बुरखा घालणे आदी प्रथांविषयीही आवाज उठवतील का ?